आडम मास्तर यांची वाढणार डोकेदुखी ; विधानसभेच्या आखाड्यात शेख बंधूंनी ठोकले शड्डू..!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १९ जुलै – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रणिती शिंदे या लोकसभेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या शहर मध्य या विधानसभा मतदारसंघावर माकप तसेच काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील दावा केला आहे. आडम मास्तर यांनी लागलीच विधानसभेच्या अनुषंगाने तयारी सुरू केल्यानंतर आता शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार आखाडा सुरू झाला आहे.
माकप पक्षाला राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघ मिळावेत यासाठी मास्तर आग्रही भूमिकेत आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम शहर मध्ये ही जागा आम्हाला सुटावी यासाठी त्यांनी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्व नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची विशेष भेट घेत त्यावर शिक्कामोर्तब केला. जेव्हा गाठीभेटीचा सिलसिला वाढत गेला, तेव्हा अनेक नवनव्या संघटना खडबडून जाग्या झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक तथा कार्याध्यक्ष तौफिक शेख यांनी कालच जयंत पाटील यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करत शहर मध्य राष्ट्रवादी आणि पर्यायाने आम्हाला मिळावा यासाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. त्यानंतर माजी महापौर आरिफ शेख यांचे नाव देखील आता चर्चेत येत आहे. शेख बंधूंनी विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकल्याने माजी आमदार आडम मास्तर यांची मात्र आता डोकेदुखी वाढलेली दिसत आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बहुमूलक मुस्लिम समुदायाच्या जोरावर तिघांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. मॅडम मास्तर यांना शहर मध्ये चे गणित पहिल्यांदा सोपे वाटले होते. परंतु आता शहर मध्य साठी शेख बंधू महाविकास आघाडीत आग्रही भूमिकेने डेरे दाखल झाल्याने आघाडीत बिघाडी होणार का ? अशी भीती व्यक्त केली जात आहे. शहर मध्य काँग्रेसची जागा असल्याने काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते यावर शहर मध्ये चे पुढचे गणित असणार आहे.
विधानसभेच्या आखाड्यात शेख बंधूंनी ठोकले शड्डू
शहर मध्य विधानसभा मतदार संघातील मतदारांचे गणित पाहता या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. मुस्लिम मतदार ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील तो उमेदवार नक्कीच विजय होणार आहे अशी खुणगाट मनाशी बांधून शेख बंधूंनी महाविकास आघाडीमध्ये मध्य ची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तोफिक शेख यांनी लागलीच सर्वेसर्वा शरद पवार यांची तातडीने भेट घेऊन मध्य साठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे आरिफ शेख यांनी देखील काँग्रेस पक्षाने शहर मध्य जागा दुसऱ्या कोणालाही देऊ नये यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
एकंदरीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शहर मध्य नाही मिळाला तर या दोन बंधूंची भूमिका काय असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.