रेशनधान्याची अनाधिकृतपणे विक्री…!
स्क्रॅप रिक्षातून हजारों क्विंटल रेशन धान्याची होतीय वाहतूक…


जिल्हा अन्नधान्य पुरवठा विभागाचे होतेय दुर्लक्ष
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०१ ऑक्टोंबर – सोलापूर शहरात अनाधिकृत बांधकाम परवानानंतर अनधिकृत रेशन धान्य विक्री करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. शहराच्या एन.जी.मिल चाळीत गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून रेशनचे गहू, तांदूळ, धान्य अनाधिकृत पद्धतीने खरेदी केले जात आहे. सदरचे खरेदी केलेले अनाधिकृत हजारों क्विंटल रेशनचे धान्य स्क्रॅप रिक्षातून विविध ठिकाणी नेऊन विक्री केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना जगण्याचा आधार मिळावा. यासाठी केंद्र व राज्यशासन मोफत रेशन धान्य वितरण व्यवस्था करत आहे. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्य संख्येनुसार प्रती मानसी एक किलो गहू व तांदूळ वितरित करण्यात येत आहे. मात्र येथे सर्रासपणे सदरचे धान्याची अनाधिकृत पद्धतीने खरेदी विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील काही नागरिकांनी आणि समाजसेवकांनी वारंवार अनाधिकृत पद्धतीने होणारी धान्यांची वाहतूक पाहिल्यानंतर सदरच्या रिक्षा चालकांना याबाबत माहिती विचारली असता, सर्व प्रथम त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर मात्र कामगारांचे धाबे दणाणले. त्यांनी फोनाफोनी करून मालकास बोलण्यास सांगितले. शेवटी पोलिसांना बोलावून संबंधित घटनेची माहिती देण्यात आली.

दरम्यान रेशनधान्य विक्री करणे कायद्याने गुन्हा असून अशा पद्धतीने दररोज शेकडो – हजारो क्विंटल धान्य विक्री करण्याचे अनाधिकृत काम सर्रासपणे केले जात आहेत. यापाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राजरोस अनधिकृतपणे रेशनधान्याची अनाधिकृत पद्धतीने खरेदी-विक्री केली जाते.
सोलापूर शहराच्या प्रत्येक भागात अशा पद्धतीने स्क्रॅप रिक्षाच्या माध्यमातून रेशन धान्य अनाधिकृत पद्धतीने खरेदी विक्री केले जात आहे. याकडे संबंधित जिल्हा अन्न धान्य पुरवठा विभागाचे आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्क्रॅप झालेल्या रिक्षा सर्रासपणे रस्त्यावर धावत आहेत. अनाधिकृत कामासाठी या रिक्षाचा वापर वाढलेला दिसून येत आहे. विनापरवाना रेशनधान्य खरेदी विक्री करण्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात शहरात सुरू आहे. याकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
– वसंत कोळी, सामाजिक कार्यकर्ते.
दोन स्क्रॅप रिक्षाच्या माध्यमातून विनापरवाना धान्याची केली जाती आहे खरेदी-विक्री..
रेशन धान्य विनापरवाना खरेदी- विक्री करताना यापूर्वी देखील ( दी.२५ ) सप्टेंबर रोजी एम.एच.१३ ए.एफ १६७५ या नंबरच्या स्क्रॅप रिक्षाच्या माध्यमातून रेशन धान्याचे अधिकृतपणे वाहतूक करण्यात आली होती. आता ( दी.०१ ) ऑक्टोंबर रोजी एम.एच.१३ ए.एफ ३३८३ स्क्रॅप रिक्षाच्या माध्यमातून शेकडो क्विंटल धान्य आणि वजनकाटा पकडण्यात आले आहे.