स्वराज्य पक्षातून शहर मध्य साठी मनीष काळजे यांनी भरला उमेदवारी अर्ज ;
भाजपच्या गलिच्छ राजकारणावर केली जहरी टीका

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२९ ऑक्टोंबर – भाजपच्या राजकारणाला कंटाळून आणि शिवसेनेच्या नर्माईच्या भूमिकेला वैतागून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी अखेर आपला शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज आज सकाळी दाखल केला. त्यांच्या सात रस्ता इथल्या कार्यालयापासून मोठ्या जल्लोषात पदयात्रा काढून हा अर्ज भरण्यात आला.
दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, युवासेना प्रमुख उमेश गायकवाड यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश करून पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी शहरातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी मनीष काळजे यांनी भाजपवर जबरदस्त टीका करताना भाजपच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आम्ही शिवसेना सोडली, परंतु आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून कायम राहणार आहोत.
भगवा हा देखील राहणार आहे. ते पुढे म्हणाले की, राजकारणात कोणत्याही परिवाराचे मक्तेदारी चालत नाही. त्यांना हे दाखवून देऊ, असा इशाराही काळजे यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे.यावेळी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.