सीनेचा पाणी प्रश्न पेटला ; नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
सिंचन भवन येथे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ मे
सीना नदीत पाणी सोडण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तसेच मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगांव आदी गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सोलापूर शहरातील उजनी सिंचनभवन मधील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
सोलापूर जिल्ह्यातील पाणी पातळी घटली आहे. अशा परिस्थितीत पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे मुक्या जनावरांसाठी सीना नदीत पाणी सोडावे अशा मागणीचे निवेदन उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी यापूर्वी उजनी सिंचन भवन कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु यावर संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता. तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार दि.५ मे रोजी सिंचन भवन येथे ठिय्या आंदोलन करत विविध घोषणा दिल्या.
प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही निर्णय घेतला नसल्याने शेतकरी आक्रमक
सीना नदीवरील पाकणी बंधारा, तरटगांव (तिरे) बंधारा व अकोले बंधारा हे बंधारे विरवडे बुद्क येथील महादेव ओढा येथून कॅनालमधून पाणी सोडून भरून द्यावे. या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटलेली आहे. माणसांना प्यायला पाणी तसेच मुक्या जनावरांना देखील चारा व पाणी नाही. अशा स्थितीमध्ये जगण्या अवघड आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. या आंदोलन सुरू असताना देखील निवेदन स्वीकारण्यासाठी कोणताही अधिकारी येथे उपस्थित नाही. तीव्र आंदोलनाचा इशारा यापूर्वी निवेदनातून दिला होता. तरीदेखील याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. पाटबंधारे प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशाल जाधव, शेतकरी तथा ग्रामस्थ तिऱ्हे