माजी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूरात ठोकला तळ : झाले बैठकांचे सत्र : विधानसभेची केली चाचपणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्या अनेकांच्या गाठीभेटी…
शहराचा सुरळीत पाणीपुरवठा यासह रोजगार निर्मितीचे असणार व्हिजन – चंद्रकांत गुडेवार
सोलापूर व्हिजन
सोलापूर , दी. २६ ऑगस्ट – सोलापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज सोलापूरात अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या भेटीदम्यान त्यांनी जनतेच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत जनतेला नेमके काय अपेक्षित आहे, याची कारणमीमांसा जाणून घेतली आहे.
सोलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी त्यांच्या जवळच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघ जागेवर त्यांनी दावा केला आहे. त्यानुसार गुडेवार यांनी सावध पवित्रा घेत पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील सर्व बारीक खणाखूनाची माहिती त्यांच्या गाठीशी आहे. त्यांचा पुरेपूर फायदा त्यांना निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा सुरुळीत करण्याचा आराखडा आखला आहे. आगामी काळात त्याद्वारे जनतेला दररोज पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. पूर्वीचे नावाजलेले अभियंता होलानी यांनी यापूर्वी चाळीस वर्षांसाठीचा पाणीपुरवठा संबंधीचा आराखडा आखला होता. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा आराखडा आखला गेला तर प्रमुख जलवाहिनी तसेच इतर उपजलवाहिनीद्वारे शहरास पाणी पुरवठा सुरळीत करणे सुलभ होईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोलापूर शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र यावरून सद्या तरी दिसून येत आहे.
सोलापरचा चेहरा मोहरा बदलणार
सोलापूरचा आणि माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा जुना ऋणानुबंध आहे. आज जुन्या मित्रांना भेट देऊन चर्चा केली. तसेच विविध संस्थाना भेट दिली. सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करणे , रोजगार निर्मिती करणे आणि विविध विकास कामांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जर उमेदवारी मिळाली तर सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– चंद्रकांत गुडेवार , माजी सनदी अधिकारी.