सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात होणार पहिल्या टप्प्यातील वाटप…..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ७ जुलै – महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपासून असंख्य महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरकारची ही योजना राबविण्यात यंत्रणेला सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहर जिल्ह्यात नारी शक्ती दूत ॲपद्वारे महिलांची नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरीत केला जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि प्रशासन याबाबत तत्पर असून याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता दिली आहे.
जिल्हा प्रशासनासमवेत नियोजन भवनमध्ये संपन्न झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले. या योजनेसह आगामी खरीप हंगामातील शेतीसाठी लागणारे बी- बियाणे , खते औषधे आणि बाधित शेतकऱ्यांचा पिकविमा यावर देखील सखोल चर्चा केली. त्याच पद्धतीने या नव्या योजनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी राज्यातील त्रिमूर्ती सतर्क आणि समर्थ आहेत. प्राथमिक स्वरूपात लवकरच एका तालुक्यात महिलांना पंधराशे रुपये निधी दिला जाईल त्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यतत्पर आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांचे ग्रामीण स्तरावरील सहकारी यासंबंधी अंमलबजावणी करतील तेव्हा ही योजना फसवी नसून असली आहे, हे विरोधकांना समजणार आहे.
दरम्यान आषाढी ही वारीसाठी राज्य सरकारने विशेष निधी जाहीर केला आहे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील आषाढी वारीला कोणतेही कमतरता भासू नये, कृत्रिम स्वच्छतागृहे, बस स्थानकावर सुविधा, वारकऱ्यांसाठी राहण्याची पिण्याच्या पाण्याची सोय , अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींचा निधी संबंधित विभागाला वितरित केला आहे. आरोग्य विभाग , महावितरण कंपनी, आदी विभागांना सदरची रक्कम बँक खात्यावर अदा केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना कोणताही अडथळा वारीमध्ये येणार नाही. याची काळजी सरकार घेत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींचा निधी वितरित
सोलापूर जिल्ह्यातील आषाढीवारी संपूर्ण भारतामध्ये नव्हे देशांमध्ये प्रसिद्ध आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक पंढरपूरकडे पायी येत असतात. अशावेळी त्यांना कोणतीही असुविधा होऊ नये. प्रत्येक दिंडीमधील वारकरी आणि दिंडी सुखरूप पंढरपूरला येईपर्यंत तसेच पुन्हा मार्गस्थ होईपर्यंत राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहणार आहे. सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच कोटींचा निधी विविध विभागांना वितरित केला आहे. त्यानुसार वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी कामकाज सुरू आहे.
कुमार आशीर्वाद , जिल्हाधिकारी सोलापूर.