राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने 20 जून रोजी तांबवे ता. माळशिरस गावाच्या हद्दीतील हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात न्यायालयाने सोमवारी धाबामालक व दोन मद्यपी ग्राहकांना एकूण सत्तावीस हजारांचा दंड ठोठावला.
सोलापूर व्हिजन
सोलापूर प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील आठवडाभरापासून धाब्यांवर दारु विक्री करणाऱ्या व बसून पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून 20 जून रोजी दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांचे पथकाने अकलूज-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावाच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी या धाब्यावर धाड टाकली असता धाबामालक शंकर संजय नुस्ते वय 26 वर्षे हा मद्यपी ग्राहक नामे किरण राजेंद्र भोसले वय 43 वर्षे व शरद महावीर गेजगे वय 27 वर्षे यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या चार बाटल्या व विदेशी दारूच्या तीन बाटल्या व काचेचे ग्लास असा 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून धाबा मालक व दोन ग्राहकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 68 व 84 अंतर्गत गुन्हा नोंद केला. तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धाबा मालकास पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एका महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम मा. न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
*आवाहन*
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील ढाबा / होटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या धाब्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील.
नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर