मनोहर सपाटे यांच्याविरोधात पेटून उठला मराठा समाज
शिवपार्वती लॉजसमोर मनोहर सपाटे यांच्या प्रतिमेला मारले सपाटून जोडे
मनोहर सपाटे नावाची काढली नेम्पलेट बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनचा लावला बॅनर
सकल मराठा समाजाने केले शिवपार्वती लॉजसमोर तीव्र निषेध आंदोलन !


प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि २ जुलै
छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल आणि मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात सकल मराठा समाज पेटून उठला आहे. शहराच्या शिवपार्वती लॉजसमोर मराठा समाजाने एकत्रित येत, मनोहर सपाटे…हाय हाय… धिक्कार असो….धिक्कार असो…मनोहर सपाटेचा धिक्कार असो…. लिंग पिसाट मनोहर सपाटे मुर्दाबाद….अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.
पुण्यातील एक महिला न्यायालयीन कामकाजासाठी सोलापुरात आली होती. सपाटे यांच्या शिवपार्वती लॉजमध्ये दोन दिवसांसाठी वास्तव्य करणाऱ्या त्या ४५ वर्षांच्या महिलेवर सपाटे यांनी अतिप्रसंग करत विनयभंग केला. त्याप्रकरणी सपाटे यांच्यावर पोलिसांनी दया न दाखवता कडक कारवाई करत ३७६ बलात्काराचा गुन्हा दाखल करावा. गंभीर स्वरूपाचे २६ गुन्हे दाखल असल्याने त्याची रवानगी येरवड्यात करावी. तसेच मराठा समाज सेवा मंडळ संस्थेवरून त्याची हकालपट्टी करावी. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोहर सपाटे यांच्या प्रतिमेला शिवपार्वती लॉजसमोर तीव्र असे जोडेमार आंदोलन करण्यात आले. त्याच प्रमाणे मनोहर सपाटे संस्कृतिक भवन ही नेम्पलेट तोडून टाकण्यात आली. त्याजागी भवनाला यापूर्वी असलेले समाजभूषण बाबासाहेब गावडे बॅनर लावून नामकरण करण्यात आले.
दरम्यान, माजी महापौरांच्या “मनोहारी लीला” व्हिडिओच्या माध्यमातून जनमानसात व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाची माथी भडकलेली दिसत आहेत. मनोहर सपाटे यांच्या विकृत मानसिकतेवर मराठा समाज बांधवांनी ताशेरे ओढले. अशा विकृत मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कडक शासन करावे. तसेच मराठा समाज एकत्रित येत, सपाटे परिवारावर बहिष्कार घालण्याची भाषा बोलून दाखवली जात आहे. पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता विकृत मनोहर सपाटे याच्यावर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मराठा समाजाच्या शिष्टमंडळ एकत्रित येत पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पीडित महिलेला तसेच ॲड. योगेश पवार यांना न्याय द्यावा. ॲड.पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस संरक्षण द्यावे. त्याच पद्धतीने गंभीर स्वरूपाचे २६ गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील सपाटे यांच्यावर कोणतीच कारवाई केली, नसल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले.
यावेळी पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, राजन जाधव, अंबादास जाधव, अमोल शिंदे, सुनील रसाळे, माऊली पवार, नाना मस्के, लहू गायकवाड, शेखर फंड, विनोद भोसले, योगेश पवार, किरण पवार, आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोहर सपाटेचे बेकायदेशीर साम्राज्य उध्वस्त केले.
माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आपल्या कार्यकाळात समाजाची तसेच इतरांची बेकायदेशीरपणे जागा लुटल्या आहेत. समाज भूषण बाबासाहेब गावडे यांच्या नावाने असलेले संस्कृतिक भवन, परस्पर आपल्या नावावर केले. असंख्य आर्थिक घोटाळे केले. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असताना सुद्धा त्याच्यावर स्थानबद्धची कारवाई केली जात नाही. विनयभंग गुन्ह्यात देखील नोटीस दिली जाते. त्याच्या विकृत मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी कडक शासन होणे गरजेचे आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शाळेचे आणि मराठा समाजाचे नाव बदनाम होत आहे. त्यासाठी सपाटे यांच्यावर एम पी डी अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदन दिले आहे. पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यामध्ये केलेली आहे.
– राजन जाधव
सपाटेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा.
मनोहर सपाटे हा विकृत असून त्याला आळा घालण्यासाठी त्याच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे शरद बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा. महत्वाचे म्हणजे ही घटना बाहेर काढणाऱ्या योगेश पवार यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. पवार यांना पोलिस संरक्षण द्यावे. पीडित महिलेला न्याय द्यावा. पोलीस प्रशासन आणि तात्कळ यासंबंधी कार्यवाही न केल्यास उपोषण करणार.
– दिलीप कोल्हे
छत्रपती शिवाजी शाळेला पोलिस बंदोबस्त
छत्रपती शिवाजी शाळेसमोर मनोहर सपाटे यांच्या विरोधात सकल मराठा समाज आंदोलन करणार असल्याचे समजल्यानंतर, शाळेसमोर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शाळेचे प्रमुख प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी आंदोलनस्थळ बदलण्यात आल्याने पोलिसांची धावाधाव झाली. अखेर सपाटे यांच्या शिवपार्वती लॉजसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
सपाटेच्या विकृतीमुळे मराठा समाज बदनाम
मनोहर सपाटे यांच्याविरोधात आता मराठा समाज पेटून उठला आहे. १९९९ पासून संस्थेतून आम्हा ३२ सभासदाना काढून टाकण्यात आले. शाळेतील देखील महिला शिक्षकांना लॉजवर बोलवायचा. अशा अनेक तक्रारी आमच्या पर्यंत आल्या आहेत. २६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्याच्यावर स्थानबद्धची कारवाई करावी. अशी मागणी पोलिस आयुक्त यांना केली आहे.
सुनील रसाळे, माजी जिल्हाध्यक्ष मराठा समाज