अवघा परिसर झाला शिवमय ! सर्वत्र पसरला शिवरायांचा जयघोष…
शिवजयंतीनिमित्त शहरातून निघाली भव्यदिव्य दिमाखदार मिरवणूक
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१९ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून भव्य दिव्य अशी दिमाखदार मिरवणूक संपन्न झाली. श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अंतर्गत सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळ यांच्यावतीने या भव्य मिरवणूक काढण्यात आल्या.यंदाची शिवजयंती ही पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर मध्यवर्तीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध मंडळांनी लेझीम ढोल ताशा हलगी पारंपारिक वाद्यवृदांच्या तालावर मिरवणूक काढली.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल झाले होते. त्यानंतर दुपारी शिवजयंतीच्या पारंपारिक मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास शिंदे चौक डाळिंबी आड येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्रींची महापूजा संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.
या शिवजयंती मिरवणुकीत सुमारे ३०० हून अधिक मंडळांनी सहभाग नोंदवला. पारंपारिक पौराणिक कथेवर आधारित असणारे देखावे यावेळी सादर करण्यात आले. खड्डा तालीम, शिवराम प्रतिष्ठान, पाणीवेस तालीम, शिवसम्राज्ञी, शिवालय, शिवाआज्ञा, अशा विविध मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले. माता प्रतिष्ठानचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गलबत नौसेनेचा देखावा उत्कृष्ट ठरला. त्याच पद्धतीने मराठा साम्राज्य, आणि पाणीवेस तालीमचा वीस फुटी अश्वारूढ पुतळा लक्षवेधी ठरला. हलग्यांचा कडकडाट आणि ढोल ताशांचा गडगडाट ऐकून शिवप्रेमी मध्ये उत्साह संचारला. त्याच पद्धतीने मैदानी खेळ देखील सादर करून शिवप्रेमींनी मंत्रमुग्ध केले.
सदरची मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील आबाल वृद्ध शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यांच्या दुतर्फा महिलांची तसेच शिवप्रेमींची मोठी संख्या होती. शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांना यावेळी विविध मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर काहींनी पाणी बॉटल देऊन सामाजिक हातभार लावला. मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सोलापूर सह इतर जिल्ह्यातील आणि राज्य राखीव पोलीस गटाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. संवेदनशील ठिकाणी देखील पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.