सोलापुर शहरात गाढवांची साजरी केली गेली कारहूनवी
गेल्या चाळीस वर्षांपासून केले जाते गाढवांचे विधिवत पूजन
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि.२१ जून – सोलापूर शहरात कारहुनवी सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कष्टकरी मुक्या जनावरांना या दिवशी सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. मग तो काळ्या शेतात राबणारा सर्जा राजा असू देत किंवा आपल्या पाठीवर विटांचे मातीचे ओझे वाहून नेणारा गाढव असू देत. सर्वजण आपल्या मालकांशी निष्ठेने काम करतात म्हणून त्यांची आज मनोभावे पूजा केली जाते. शेतातील बैलजोडीला बळीराजा सजवून त्याची पूजा करतो त्याला नैवेद्य अर्पण करतो. त्याच अनुषंगाने शहरातील मोची समाजाकडून कारहूनवी सणाला गाढवांचे रंगरंगोटी करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. या दिवशी त्यांना कोणतेही काम लावले जात नाही केवळ आराम दिला जातो. या मुक्या जनावरांच्या माध्यमातून उदरनिर्वाह केला जातो त्यांना लक्ष्मी प्राप्त होते म्हणून कारहूनवी सणाला त्यांची मनोभावे पूजा केली जाते असे यावेळी सांगण्यात आले.
गेल्या चाळीस वर्षांपासून पशु पालकांकडून केले जाते गाढवांचे पूजन
दरम्यान शहरातील विविध भागात आज गाढवांना स्वच्छ धुऊन रंगरंगोटी करण्यात आली त्यानंतर सजवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पशुपालक म्हणून मालकांनी त्या गाढवांना गोडाचे जेवण दिले गेल्या चाळीस वर्षांपासून मोची समाजामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पिढ्यानपिढ्या हे कार्य सुरू आहे असे व्यावसायिक तथा पशुपालक हनुमंत पदे यांनी सांगितले. दरवर्षी कारहूनवी या सणाला गाढव पूजा करून हे वर्ष चांगले सुख-समाधानाचे समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करण्यात येते.