डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे सोलापूरकरांशी रक्ताचे नाते : शैलेंद्र बोरकर…
३४ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदात्यांचा आणि शिबीर संयोजकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि. २८ : डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून गेल्या ३४ वर्षांपासून गरजूंना रक्तपुरवठा अविरतपणे सुरु आहे. १९९० सालापासून निःस्पृहपणे कर्तव्यभावनेने हे सेवाकार्य केलं जात आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढीने सोलापूरकरांशी खऱ्या अर्थाने रक्ताचं नातं तयार केलं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सेवाकार्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र बोरकर यांनी केले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदात्यांचा आणि शिबीर संयोजकांचा कृतज्ञता सोहळा शिवस्मारक येथे रविवारी (दि. २८) पार पडला. यावेळी श्री. बोरकर यांच्यासह म्हाडा (मुंबई) चे सहसंचालक तथा वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, जी. एस. टी. विभागाचे अधीक्षक अजित लिमये, यावेळी शहर संघचालक राजू काटवे, रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, उपाध्यक्ष विष्णुदास मालू, सचिव सत्यनारायण गुंडला यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या विचारांनुसार चालत या रक्तपेढीने सेवाकार्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सेवाभारतीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न ओळखून ३५ प्रकारचे सेवाकार्य चालते. त्याअंतर्गत केवळ महाराष्ट्रात १ लाख १२ हजार संस्था कार्यरत आहेत. यामध्ये डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. केवळ रक्तपुरवठाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वंचितांच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचा जागरही ही रक्तपेढी करत आहे, असे बोरकर म्हणाले.
रक्तपुरवठा करून शेकडो गरजूंना जीवनदान देणाऱ्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला आपण सर्वांनी अर्थपुरवठा करून आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार व श्री. लिमये यांनी केले. तत्पूर्वी रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे यांनी प्रास्ताविकात रक्तदात्यांच्या वाढत्या संख्येबद्दल समाधान व्यक्त केले. रक्तपेढीचे सचिव सत्यनारायण गुंडला यांनी अहवाल वाचनातून २०२३-२४ या वर्षातील रक्तपेढीच्या कामकाजाचा लेखजोखा मांडला.
कृतज्ञता सोहळ्यात द्विशतकवीर रक्तदाते अशोक नावरे, शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांच्यासह रक्तसंकलन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. रक्तपेढीचे व्यवस्थापक रंगनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली धोंडे यांनी स्वागतगीत तर भास्कर चिलवेरी यांनी पद्य सादर केले. इंडियन मेडिकल असोसिशन सोलापूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. किरण सारडा तसेच डॉ. विजय शिवपुजे, सुनील इंगळे, महेंद्र कावरे, मिलिंद फडके, सुहास जोशी, नितीन कवठेकर, डॉ. शांतीनाथ बागेवाडी, प्रकाश कुलकर्णी आदी रक्तपेढीचे संचालक, जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे यांच्यासह रक्तदाते व शिबीर संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३ लाखांपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन
१९९० सालापासून सुरु झालेल्या ३४ वर्षांच्या वाटचालीत डॉ. हेडगेवार रक्तपेढीने ३ लाख २१ हजार ७५१ इतक्या रक्तपिशव्या संकलन केले. २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या २७१ रक्तदान शिबीरांमधून १० हजार २८९ इतक्या रक्तपिशव्यांचे संकलन झाले. पुरुष रक्तदात्यांची संख्या ९९३७ तर महिला रक्तदात्यांची ३५२ इतकी आहे.