प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२० एप्रिल
उन्हाची पर्वा न करता जनसागराच्या उत्साहाला उधाण ; नेत्रदीपक सजावट !!!
– डॉल्बीच्या दणदणाटात हायटेक मिरवणूक !!!
– ऐतिहासिक देखाव्यातून घडले डॉ. आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन !!!
दरम्यान, बॉबी ग्रुपच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील भव्यदिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे आधारस्तंभ अजित भाऊ गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यंदाची मिरवणूक दिमाखदार निघाली. माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या देखाव्याचे व मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारी मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरात बाबासाहेबांची ऐतिहासिक अशी मिरवणूक गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात येते. बाबासाहेबांचा सोलापूर शहरास अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध कायम आहे. वळसंग येथील ऐतिहासिक विहीर असू देत किंवा फॉरेस्ट मधील ते घर… बाबासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात.
बॉबी ग्रुपसह शहरात पीबी ग्रुप, जीएम ग्रुप, आरजी ग्रुप, स्वाभिमानी आर.जी, रमापती, बुद्धराष्ट्र, असे अनेक संस्थांच्या वतीने भव्य दिव्य दिमाखदार देखाव्यांसह मिरवणूक काढतात. सदरच्या ऐतिहासिक मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील त्याच पद्धतीने नागपूर विदर्भ मुंबई पुणे येथील तमाम भीमसैनिक सोलापुरात मुक्कामी येतात. मिरवणुकीचा उत्साह अनुभवून आनंदाने आपल्या घरी परततात. आणि पुढील वर्षी येणाऱ्या जयंती उत्सवाच्या मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहतात…


मेरे भिम जी ने सब उजला उजला कर डाला,
पुरे चाहनेवाले को उसका मुह काला कर डाला!
माय-बापाउन भिमाचे उपकार लय हाय र,
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! कडूबाई खरात यांनी गायलेले गीत त्याचबरोबर तुम्ही कितीही लावा शक्ती आणि कितीही लढवा युक्ती तुम्ही कराल कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला आनंद शिंदे यांनी गायलेली गाणी ‘साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भिमाचा दरारा हाय या कडूबाई खरात त्यांनी गायलेल्या गीताचे वास्तव चित्र रविवारी (दि.२०) सकाळपासूनच शहरातील रस्त्यावर पाहायला मिळाले. जय भीमच्या जयघोषणात हजारोच्या संख्येने भीमसैनिक मिरवणूकमध्ये सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट गर्दी होती. यंदाच्या वर्षी १०० मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यात डीजेच्या तालावर बेधुंद होऊन जल्लोषात नाचणारी तरुणाई, आकर्षक विद्युत रोषणाई, आतशबाजीने उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी उन्हाची पर्वा न करता शहरातील चारही दिशांनी भीमसागर मिरवणुकीत लोटला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती सोहळ्यात शहरभर वाजत होती. सार्वजनिक जयंती सोहळा साजरा होत असल्याने भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात प्रसिद्ध असलेली मिरवणूक अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. तरुणाईचा जल्लोष… भव्य मिरवणूक… डीजेचा ताल…आकर्षक सजावट…डोळे दिपतील अशी विद्युत रोषणाई…फटाक्यांची आतिषबाजी…डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर भीमसैनिकांनी नाहून निघाला होता. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त व उत्सव समितीच्यावतीने सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास पूजन करण्यात येऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत शंभर मंडळांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक परिसर भीमसैनिकांनी फुलून गेला होता. सर्व मंडळाकडून सामाजिक संदेश देणारे देखावे बाबासाहेबांच्या विचारांच्या फलकांनी रस्ता गजबजला होता. तरुणांनी घातलेल्या निळ्या फेट्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत निळा सागर पाहायला मिळत होता. त्याचबरोबर चौकाचौकात विविध पक्ष- संघटनांच्या मंचावर मंडळातील अध्यक्ष व पदाधिकारी सत्कार करण्यात येत होता. त्यांना हार घालून फेटा बांधला जात होता. शहरातील आमदार, खासदार, माजी नगरसेवकासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन भीमसैनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पार्क चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचा जनसागर लोटला होता. डीजेच्या तालावर बाबासाहेबांच्या हातात फोटो घेऊन तरुणाई यांच्यासह आबाल वृद्ध, युवक-युवतींनी विविध गीतांवर लक्षवेधी ठेका धरला होता.
ऐतिहासिक देखाव्याने वेधले सोलापूरकरांची लक्ष मिरवणुकीत ऐतिहासिक देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध देखावे करण्यात आले होते. यामुळे शहरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील देखील लोकांचे ऐतिहासिक देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी रविवारी पार्क चौक येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी जनसागर लोटला होता. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर अनुयायी नतमस्तक झाले. काहींनी याठिकाणी सहकुटुंब फोटो देखील काढले तर तरुणांमध्ये उत्साह होता. त्यामुळे वातावरण अल्हाहदायी बनले होते.
पाणी सरबत वाटप
मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संघटनांकडून सरबत, पाणी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी तीव्र उन्हात मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीम अनुयायांनी मोफत अल्पोपहार तसेच पाण्याची सोय केल्यामुळे त्याचा आस्वाद घेतला.
– मुख्य मिरवणूक चालली १२ तास
– मिरवणुकीत १०० मंडळे सहभागी
– मिरवणुकीत अंदाजे ४ लाख अनुयायी दाखल
– मिरवणुक बंदोबस्तासाठी जवळपास १९०० पोलिस तैनात
डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविणारे प्रबोधनात्मक देखावे….
छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान, भीममुद्रा सामाजिक संस्था, प्रशिक सामाजिक संस्था, जी. एम. सामाजिक संस्था, आयडल्स सामाजिक संस्था, भीमगर्जना तरुण मंडळ, भीमप्रकाश प्रतिष्ठान, पी. बी. ग्रूप, बुद्धदर्शन सामाजिक संस्था, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान, आर. जी. (राजगृह) बहुउद्देशीय सामाजिक संस्था, के.डी ग्रूप, बुद्धभूमी सामाजिक संस्था, आनंद बौद्ध मंडळ, अशोक जागृती तरुण मंडळ, भीमरत्न तरुण मंडळ, सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळ, भीमयुग सामाजिक संस्था, बाॕबी ग्रुप, भीमशक्ती सामाजिक संस्था, डी. एन. प्रतिष्ठान, महात्मा फुले तरुण मंडळ, आम्रपाली तरुण मंडळ, भीममुद्रा प्रतिष्ठान, कर्मवीर सामाजिक संस्था, डॉ. आंबेडकर, फुले – शाहू – प्रतिष्ठान, रमापती तरुण मंडळ, : रमांजली तरुण मंडळ, भीम युवक तरुण मंडळ, अशोक जागृती तरुण मंडळ, आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था, एस. बी. प्रतिष्ठान, सिद्धार्थ तालीम संघ, भीमगर्जना तरुण मंडळ, सिद्धार्थ तरुण मंडळ, भिम शक्ती सेना तरुण मंडळ, सिद्धार्थ फाउंडेशन, मातोश्री रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ यासह शहरातील आमराई, देगाव नका, विजापूर रोड, लष्कर आदी परिसरातील मंडळांनी या मिरवणुकीत आकर्षक अशी सजावट करून लक्षवेधक देखावे सादर केले होते. नेत्रदीपक अशी सजावट आणि देखावे साकारण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर सर्वत्र दुतर्फा जनसागर लोटला होता.