महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी जनसामान्यांनी पाठबळ द्यावं :- उप मुख्यमंत्री अजित पवार
बुलढाण्यात साधला लाडक्या बहीणींशी संवाद….!
बुलढाणा , दि. १९ सप्टेंबर – बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहभागी होत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
दरम्यान सर्व समाज घटकातील माझ्या मायमाऊलींना, भगिनींना सशक्त, सक्षम आणि सबल करण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालेला फायदा स्वतः बहिणींकडून जेव्हा कळतो, त्यातून मिळणारा समाधान मोठा आहे. लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांवर महिलांनी छोटासा व्यवसाय उभा केला आणि नफा देखील मिळवला, ही बाब अतिशय आनंदाची आहे.
याशिवाय लखपती दीदी योजना सरकार देशभर व्यापक स्तरावर राबवत असून महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळावा याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. यासोबतच आपल्या मुली चांगलं शिकून कुटुंबाचा भक्कम कणा बनाव्यात, यासाठी त्यांना शिक्षण मोफत केलं आहे.
बहिणींसोबत भाऊ सुद्धा लाडके आहेत. अन्नदात्या शेतकरी बांधवांचं वीज बिल राज्य सरकारनं माफ केलं आहे. एक रुपयात पीक विमा योजना आम्ही सुरु केली आहे. दुधावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान आम्ही देत आहोत. बारावी आणि पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता आपण सुरु केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील लोकांसाठी कल्याणकारी योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत. सरकारनं चालू केलेल्या योजना दीर्घकाळ चालूच ठेवायच्या असतील तर, महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी जनसामान्यांनी पाठबळ द्यावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.