पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी करण्यात येणार आवश्यक सुविधांचे नियोजन : विधान भवनातील बैठकीत यांनी दिल्या सूचना…

पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीत दिल्या.

सोलापूर व्हिजन पुणे दिनांक – आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे,संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा. इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टेने विभागीय आयुक्तांकडे  बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *