उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा ठरणार शिवसैनिकांना ऊर्जा देणारा : जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी…

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा ठरणार शिवसैनिकांना ऊर्जा देणारा : जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१८ एप्रिल 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी (दि.२१) होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी माढा येथे सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवी ऍग्रो ऑईल प्रा. लि. या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माढा येथे होणार असून यानंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.

या सभेसाठी माढ्यातील शेटफळ रोड येथे १५० बाय ५०० चौरस फुटांचा भव्य मंडप उभारणीचे काम सुरू आहे. तसेच ६० बाय ४० चौरस फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे सभामंडपात २५ हजार खुर्च्या लावण्यात येत आहेत. या मंडप उभारणीच्या कामास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी करत सूचना दिल्या. प्रचंड ऊन असल्यामुळे शिवसैनिकांना पिण्याच्या पाण्याची, भोजनाची, पार्किंगची तसेच सावलीची सोय योग्य प्रकारे होण्याबाबत प्रा. सावंत यांनी वैयक्तिक लक्ष घालून व्यवस्थेबाबत सूचना दिल्या.

आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील विस्तारासाठी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा फलदायी ठरेल, असे सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सांगितले. सोमवारी होणाऱ्या जाहीर सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *