तब्बल २४ मोबाईल चोरीचा छडा; आरोपींच्या ताब्यातून ०२,४४,९०९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : शहर गुन्हे शाखा आणि फौजदार चावडी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीत चोरीचे मोबाईल विक्रीसाठी थांबलेल्या संशयित तरुणास ताब्यात घेण्यात आले. त्याची झाडाझडती आणि केलेल्या चौकशी माणिक चौकातील एन. जी. इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपीतील २४ मोबाईल चोरीचा छडा लावण्यात यश आलाय. या गुन्ह्यात दोन आरोपींना गजाआड करण्यात आलं असून उभयतांच्या ताब्यातून ०२,४४,९०९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.

येथील माणिक चौकातील एन. जी. ईलेक्ट्रानिक्स मोबाईल शॉपी रात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व कानातील इअरपॉड चोरीस गेले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे भा.दं. वि.सं. कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यासंबंधीच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या होत्या.त्यानुसार गुन्हे शाखा व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार  या गुन्ह्याचा कसून तपास करीत होते. दरम्यान १७ जून रोजी गुन्हे शाखेेकडील सपोनि विजय पाटील व त्यांचे तपास पथक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील सपोनि शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांनी मिळालेले गोपनीय माहितीनुसार सोलापूर-पुणे महामार्गावरील बंद पडलेल्या राहुल हयुन्डाई शोरुम जवळ थांबलेल्या एका संशयित तरुणास ताब्यात घेतले.

त्याचेकडे चौकशी करता, तो तरुण मोबाईल विक्री करण्याच्या उद्देशाने तेथे थांबला होता. त्याचे नाव कासिम ऊर्फ सोहेल शफिक शेख (वय-२७ वर्ष, रा.९२ सिध्देश्वर पेठ, पटेल किराणा शॉपचे समोर, सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक चौकशी करता, ते चोरीचे मोबाईल फोन हे, त्याचा मित्र जमीर रफिक बागवान (वय-३४ वर्ष, रा.लक्ष्मी मार्केट, सोलापूर) याने दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले.जमीर बागवान याने एम. जी. इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी कासिम ऊर्फ सोहेल शफिक शेख याच्याकडे दिले होते. त्याच्या ताब्यातून चोरीचे २४ मोबाईल फोन, ०४ स्मार्ट वॉच, १० कानातील इअरपॉड असा ०२,४४,९०९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस स्टेशन करीत आहेत. दोन्ही आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती-प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-१) तोरडमल, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पाटील व सपोनि शंकर धायगुडे, पोलीस अंमलदार प्रविण चुंगे, राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विनोद व्हटकर, कृष्णात बडुरे, अतिश पाटील, विनोद पुजारी, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड यांनी संयुक्तपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *