क्लेम ठेवण्यासाठी काँग्रेसने शहर मध्य केले काबीज ; माकपला ठेवले झुलवत
काँग्रेसने शहर मध्य साठी खेळली वेगळी खेळी ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३० ऑक्टोंबर – होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आता जोमात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तसेच महायुती आणि इतर अपक्षांची मोठी धावपळ दिसून आली. महाविकास आघाडी तसेच महायुती यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर आपला क्लेम कायम ठेवला आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस, माकप, यांनी आपापले अर्ज सादर केले. त्याच पद्धतीने महायुतीतून भाजप, स्वराज्य परिवर्तन आघाडी, मनसे, आणि इतर अपक्षांनी सुद्धा अपेक्षेप्रमाणे अर्ज सादर केले. तत्पूर्वी शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जोरदार खडाजंगी दिसून आली.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला. शिंदेसेनेचे शिवसैनिक मुंबईमध्ये तळ ठोकून होते. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व सिद्ध करत ही जागा आपल्याकडे खेचून आणली. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांच्या शिवसैनिकांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत, छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य परिवर्तन आघाडीत प्रवेश करत, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ शहर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत येथे आपले अर्ज सादर केले.
तर तिकडे महाविकास आघाडीत सुद्धा शहर मध्य विधानसभा जागेवरून बिघाडी झाली. प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभारल्या, तेव्हा माजी आमदार आडम मास्तर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून आम्हाला म्हणजेच माकपला देण्यात यावा. तरच आपण लोकसभेचे काम करू अशी मागणी करत शब्द घेतला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी आडम मास्तर यांना शब्द देखील दिला. त्यानंतर मास्तर यांनी स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत सर्व नेत्यांना व पक्षश्रेष्ठींना भेट देऊन विधानसभा निवडणुकीवेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ माकपला देण्याची मागणी केली. तेव्हा आघाडीतील सर्व नेत्यांनी आडम मास्तर यांना होकार दर्शवला परंतु, काँग्रेसने नवी खेळी करत अंतिम क्षणापर्यंत कोणताच थांगपत्ता लागू दिला नाही. शेवटी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिल्यानंतर माकपने आघाडीचा धर्म कुठे गेला हा प्रश्न काँग्रेससमोर उपस्थित केला आहे.
दरम्यान दक्षिणमध्ये आपल्याच उमेदवाराचे खच्चीकरण करून वेगळे राजकारण सुरू केले आहे. तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आपला क्लेम कायम ठेवण्यासाठी आडम मास्तर यांना झुलवत ठेवले. एकीकडे आपल्याच एकनिष्ठ कार्यकर्त्याचे गळचेपी करणे आणि दुसरीकडे आपल्याच मित्र पक्षाला बगल देत, आघाडीत बिघाडे निर्माण करणे, असे ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका काय असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याच गोष्टीवरून आता माकप पक्ष आक्रमक भूमिकेत आला असून निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जाहीर सभेत प्रणिती शिंदे यांनी केला गेमचा उल्लेख….
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी चेतन नरोटे यांना जाहीर झाली. त्यानंतर भव्य दिव्य अशी सभा रामलाल चौक येथे पार पाडले. या सभेत प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, गेल्या दहा दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडी सांगत, शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आमचा वारसदार ठरला आहे. आमचा क्लेम ठेवण्यासाठी आम्ही करेक्ट गेम केला. त्यांना वाटले असेल आम्हाला गेम खेळता येत नाही परंतु आम्ही विरोधकांचा चांगला गेम केला.
असे त्या म्हणाल्या, त्यामुळे शहर मध्य आपण जिंकणारच त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि चेतन नरोटे यांना जिंकून आणावे असे उल्लेख केल्यानंतर, राजकीय वर्तुळात सर्व नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष करून माकपचे कार्यकर्ते यावरून चांगलेच तापलेले दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवू, असे आव्हान दिले जात आहे.