आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी लागली रस्सीखेच… शहराध्यक्षांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज…

सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ८ ऑगस्ट – आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच सुरू झालेले दिसत आहे. काँग्रेस पक्षांतर्गत शहर उत्तर , मध्य आणि दक्षिण या तीनही विधानसभा जागेसाठी अनेक इच्छुकांनी काँग्रेस पार्टी कार्यालयाकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे.

अधिकृतरित्या उमेदवारी अर्जाची फी भरून अनेकांनी उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे. अशातच आता दस्तूर खुद्द शहराध्यक्षांनीच शहर मध्यवर दावा ठोकत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी आपल्यालाच मिळावी अशा स्वरूपात दावाच त्यांनी ठोकला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून चेतन नरोटे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सदरचा अर्ज सूपूर्द केला.

यापूर्वी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे, अंबादास बाबा करगुळे आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदौस पटेल, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, मैनुद्दीन (रुस्तुम) कंपली यांनी देखील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली.

दरम्यान विधानसभा निवडणुकीला आतापासूनच रंगत आणण्यास सुरुवात झाली आहे. शहर मध्य काँग्रेसची जागा असून यावर काँग्रेस पक्षातील अनेक इच्छुकांचा डोळा आहे.
जरी आडम मास्तर यांना सुशील कुमार शिंदे यांनी शब्द दिला असला तरी मध्य मतदारसंघावर काँग्रेस पक्षातील नेत्यांची वाढती मागणी लक्षात घेता, यावर आता पक्षश्रेष्ठी तसेच सोलापूरचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी काय निर्णय घेतलेले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.