धवलसिंह मोहिते पाटलांनी आत्मपरीक्षण करावे – चेतन नरोटे
पक्षातच राहून काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी राजीनामा देण्याचे केली टीका !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ डिसेंबर
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आता काँग्रेस पक्षामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पत्रात शिंदे परिवारावर टीकास्त्र सोडल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
दरम्यान, शहराध्यक्ष नरोटे यांनी मोहिते पाटील यांच्या पत्राचा आधार घेत, आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला. धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले. वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवडयापूर्वीच कळाले होते. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात. त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे यांनी सन्मानाने जिल्हाअध्यक्ष केले. त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले. पद घेताना नेत्यांचे दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायचे ही कुठली पद्धत आहे? असा सवाल उपस्थित करताना मोहिते पाटील यांना चेतन नरोटे यांनी आरसा दाखवला आहे.
तसेच त्यांनी माझ्यावर हि टीका केली. माझ्या प्रभागात लोकसभा निवडणुकीत लीड नाही म्हणून खोटे बोलले. वास्तविक पाहता, लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रभागात प्रणितीताई शिंदे यांना ९४४१ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना ७४८६ मते मिळाली. १९५५ मताची लीड प्रणिती शिंदे यांना माझ्या प्रभागातून मिळाली आहे. पक्षाचा आदेश म्हणून विधानसभा निवडणूक लढवलो. निवडणुकीत हार जीत होत असते. यापुढे ही पक्षासाठी लढत राहू. काही लोक काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करत असतात त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा. अशी खोचक टीका केली.