मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द ;
प्रकृती अस्वस्थ झाल्याने सर्व कार्यक्रम स्थगित ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ८ ऑक्टोंबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौराही पाचव्यांदा रद्द झाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास कल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार होती. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे ४० हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. यासाठी राज्य शासनाने महिलांच्या प्रवासासाठी सुमारे ४०० हून अधिक एसटी बसेसची सोय करण्याचा आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने सर्व दौरे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तत्पूर्वी दुपारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार होते परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने शिंदे गटात निरुत्साह पसरला आहे. विविध वृत्तवाहिन्यांवर एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याची बातमी प्रसारित झाल्याने शिंदे गटात आनंदावर विरजण पडलेले दिसत आहेत. या वचनपूर्ती सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली होती. संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी कार्यरत होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे महिलांना मैदान येथे आणले होते. परंतु एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याची बातमी प्रसारित होतात शिंदे गटात निरुत्साह दिसून येत आहे.
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम अक्कलकोटमध्ये सुरू आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहरात दाखल झाले आहेत, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा यापूर्वी चार वेळा रद्द झाला आहे. तब्येत बिघडल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाचव्यांदा आपला सोलापूर दौरा रद्द केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात पोचले आहेत. मात्र, शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.