आयटी पार्क अन् श्रेयवाद सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर रंगला भाजपा अंतर्गत कलगीतुरा…

आयटी पार्क अन् श्रेयवाद सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर रंगला भाजपा अंतर्गत कलगीतुरा…

विजय मालकांनी केली उद्योगाची मागणी तर देवेंद्र कोठेंनी सोशल मीडियावर व्हायरल केले आयटी पार्कच्या पाठपुराव्याचे पत्र 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर | प्रतिनिधी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा अनेक विषयांसाठी चर्चेचा ठरला आहे. आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या कामगारांच्या सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर आता नागरिकांना हक्काचे घर राहायला मिळाले. पण त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक मोठा उद्योग सोलापूरला आणावा अशी मागणी तर केलीच पण त्यांनी त्यानंतर आयटी पार्क सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला देतील असाही विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सोलापूरला निश्चित आयटी पार्क आणला जाईल. परंतु योग्य जागा शोधा असे सांगून पालकमंत्री आणि ईतर आमदार विजयकुमार देशमुख यांनाच कामाला लावले. राज्याच्या एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क तयार करू अशी अशी घोषणा करून टाकली. यानंतर या आयटी पार्कची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी उडी घेत, आयटी पार्क आणि विशेष करून एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्याचे पाठपुराव्याचे पत्र त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. हे पत्र कोठे यांनी दि.१५ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते.

या आयटी पार्क ची घोषणा केल्याबद्दल देवेंद्र कोठे यांनी “साहेब आजच्या आपल्या घोषणामुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले याचा आनंद होतोय त्याबद्दल आपले त्रिवार आभार” अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या आयटी पार्क वरून आता सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये यावरून चांगलाच वाद विवाद सुरू झाला आहे. दोघांचे कार्यकर्ते आता आपल्याला नेत्याच्या पाठ थोपटवण्यात चांगलेच रंगलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट व्हायरल होत असल्याने, आता आयटी वरून घमासान सुरू होऊन भाजपा अंतर्गत कलगीतुरा… रंगतोय का ? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *