सेतू कार्यालयासह महा-ई-सेवा केंद्रमध्ये महिलांची दाखले काढण्यासाठी एकच गर्दी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १ जुलै – राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये २१ ते ६० वयोगटातील मुली आणि महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाणार आहेत. सदरची योजना जाहीर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गामध्ये या योजनेची उत्सुकता लागली आहे. योजनेसाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असून त्यामध्ये रहिवासी दाखला उत्पन्न दाखला बँक पासबुक आधार कार्ड गॅजेट सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट रेशन कार्ड असे कागदपत्रांचा समावेश आहे. विशेष करून प्रतिवर्षी अडीच लाख उत्पन्न रेषेखालील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान सदरची योजना जाहीर झाल्यानंतर महिलांनी विविध ठिकाणाच्या महा-ई-सेवा केंद्र आणि जिल्हा परिषदेतल्या सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसत आहे. ज्यांच्याकडे रहिवासी दाखला नाही अशा महिलांनी राहायची दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. उत्पन्न दाखला काढण्यासाठी देखील सेतू कार्यालयात मुली आणि महिलांच्या रांगा दिसून येत आहेत. उत्पन्न आणि रहिवासी दाखला प्राप्त झाल्यानंतरच सदरचा अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये तसेच महा-ई-सेवा केंद्र मध्ये भरावयाचा आहे. सर्व कागदपत्रे जुळवून ती सादर करावयाची आहेत. जमा केलेल्या कागदपत्रांची तपासणी आणि छाननी होऊन पात्र लाभार्थी निवडले जाणार आहेत. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा महिलांमध्ये चांगलाच परिणाम पडलेला दिसत आहे. विशेष करून महाविद्यालयीन मुली आणि विवाहित महिलांनी सकाळपासूनच महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती.
सदरची योजना कार्यान्वित झाल्यानंतर अर्ज भरले जाणार आहेत. सध्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहेत. या योजनेसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न होणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्यासंबंधी तसेच आवश्यक कागदपत्र संबंधित सूचना आणि निर्देश दिले जाणार आहेत त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.