बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ ; नवनियुक्त अशासकीय प्रशासक अमोल शिंदे यांची ग्वाही
महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आणणार उपयोगत….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १८ जुलै – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत १४ जुलै रोजी संपल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
निंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर राज्य शासनाने मोठा बदल करत आता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. सदरचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे नंतर दुसरे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचीही अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान काही वेळापूर्वीच जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची अशासकीय प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर थोड्या वेळातच अमोल शिंदे यांचीही बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र निघाले आहे. सोलापुरात पंढरपूरच्या आषाढी वारी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला. त्यावेळी अमोल शिंदे हे या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सावलीप्रमाणे अगदी जवळ असल्याचे पाहायला मिळाले. अमोल शिंदे हे राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. याची नक्कीच पावती अमोल शिंदे यांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये आता शिवसेना पक्षाचे दोन अशासकिय प्रशासकीय मंडळ सदस्य झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भारतीय जनता पार्टीचे तीन असे सात सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळत आहे.
शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पणन मंत्री अब्दुल सत्तार , शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, शिवसेना पक्षाने तसेच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खरा ठरवून दाखवणार आहे. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर काम करून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव यासाठी कामी येणार आहे.
अमोल शिंदे , नवनिर्वाचित प्रशासक तथा जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर.