लाडक्या बहिणींना मिळणार जानेवारीचाही हप्ता ! अंगणवाडी कर्मचारी, आशाताईंना मात्र मानधनाची अपेक्षा
– लाडक्या बहिणीचा भत्ता मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर ; बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांची माहिती
– सुमारे १ कोटी १२ लाख ४४ हजार २५० रुपये भत्ता शासनाकडून येणे बाकी !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. ७ डिसेंबर
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांचे यशस्वी अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सीआरपी यांना प्रतिअर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता शासनाकडून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे यांच्याकडे भत्ता मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. भत्त्याची रक्कम मिळण्यासंदर्भात आयुक्त कार्यालयाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ११ लाख २० हजार ५९४ अर्ज प्राप्त झाले होते. या योजनेच्या निकषात बसून १० लाख ५० हजार ४०५ लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले. तर ९ हजार ५०० च्या आसपास अर्ज अपात्र झाले. एकूण अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सीआरपी यांनी सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लाख २४ हजार ८८५ लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत. प्रतिअर्ज पन्नास रुपयेप्रमाणे १ कोटी १२ लाख ४४ हजार २५० रुपये भत्ता शासनाकडून येण्याची प्रतीक्षा आहे.
आम्हाला अजून प्रतीक्षा
लाडक्या बहिणींना येत्या १४ जानेवारीपर्यंत योजनेतील प्रत्येकी १ हजार ५०० रुपये हप्ता देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणार जानेवारीचाही हप्ता, अंगणवाडी कर्मचारी, आशाताईंना मात्र मानधनाची प्रतीक्षा लागलेली आहे.
व्यथित अंगणवाडी सेविका.