छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर पुष्पवृष्टी…

मुस्लिम बांधवांनी दिला समतेचा आणि एकात्मतेचा संदेश!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी.१२ जानेवारी
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेतील तैलाभिषेक धार्मिक विधी शहरातील ६८ लींगांवर अभिषेक करून संपन्न झाला. यावेळी मिरवणूक मार्गावर मुस्लिम बांधवांनी मानाच्या पालखी आणि नंदीध्वजांवर गुलाब पुष्प उधळून हम सब एक है चा नारा देत स्वागत केले.
दरम्यान, सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूर शहरवासीयांना समतेची, एकात्मतेची आणि सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. हीच मूल्ये प्रमाण मानून मुस्लिम बांधवांनी देखील याच पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मानाच्या पालखीचे व नंदीध्वजांचे स्वागत करण्याचे आयोजन केले होते. आजसकाळी नऊ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यातून तैलाभिषेक या धार्मिक विधीची सुरुवात झाली. यावेळी मानाची पालखी आणि मानाचे सात ही नंदीध्वज सकाळी नऊ वाजता हिरेहब्बू वाड्यातून तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी रवाना झाले. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाटेमध्ये भाविक भक्तांनी पालखीचे तसेच मानाचे नंदीध्वज यांचे दर्शन घेतले.
दरम्यान, सदरची पालखी मिरवणूक विजापूर वेस येथे दाखल झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मुस्लिम मावळ्यांनी श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या पालखीवर आणि मानाच्या नंदीध्वजांवर गुलाब पुष्प उधळून हम सब एक है च्या घोषणा दिल्या. त्याच पद्धतीने यात्रा प्रमुख हिरेहब्बू बंधूंना व आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह मानकरी यांना पुष्पहार घालून यात्रा मिरवणुकीचे स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मुस्लिम मावळ्यांनी सुरू ठेवली असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे, रिजवान शेख, बशीर सय्यद, तनवीर गुलजार, रिजवान दंडोती, रियाज पैलवान लक्ष्मण भोसले, अनिल उकरंडे, वाहिद तांबोळी, फुकरान बागवान, उजेर बागवान, आयान बाग, कमर उटगी,करीम शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.