शिवजयंती उत्सवात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान;
शिवप्रेमींकडून कृतज्ञतेचा अनोखा संदेश

सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.




कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सुभाष देशमुख, महापौर विनायक कोड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या वातावरणात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डाळिंब आड येथील मैदानात भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून शिवजयंती उत्सवाचा औपचारिक शुभारंभ झाला.
दरम्यान, १९ फेब्रुवारीपर्यंत विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, महिलांसाठी विशेष उपक्रम, कुस्ती स्पर्धा तसेच युवकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेतील नगर अभियंता विभाग, विद्युत विभाग तसेच घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचारी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून आयोजकांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश दिला.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बरडे-बचुटे यांच्यासह संजीवनी मुळे, उज्वला साळुंखे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, नगरसेवक विनोद भोसले, शिवाजी वाघमोडे, ज्ञानेश्वर सपाटे, बाबासाहेब जाधव, दत्तामामा मुळे, सुशील बंदपट्टे, आशुतोष बरडे, विजय पुकाळे, प्रकाश ननवरे, भाऊसाहेब रोडगे, राजू काकडे, बापू जाधव, सुषमाताई घाडगे, मनीषा माने, चारुशीला जगदाळे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास घुले व सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.