केंद्रीय पथकाने सोलापूर बाजार समितीची घेतली झाडाझडती..!

केंद्रीय कृषी मंत्रालयातील पथकाने बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत दिल्या मार्गदर्शक सूचना..!

दिल्लीच्या केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमधील शेतमालाच्या बाजारभावासह उत्पादनक्षमता आणि विविध विभागांची तपासणी करून केंद्र आणि राज्य सरकारला देणार अहवाल !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २६ सप्टेंबर – महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले होते. दिल्लीच्या केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या शेतमालाच्या बाजारभावासह, उत्पादनक्षमता आणि खरेदी – विक्रीसह बाजार समितीत कार्यरत असणाऱ्या विविध विभागांची तपासणी केली.

       दरम्यान या केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालय विभागातील अव्वर सचिव जे.के. मनोज , कृषी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार , सहायक संचालक मुकेश कुमार , पुण्याचे वरीष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे , सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष घटक योजना कृषी अधिकारी नंदकुमार पाचकूडवे आदींचा समावेश होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो. बाजारात आवक झालेल्या कांद्याला मिळणारा योग्य दर , आडत आणि खरेदीदार व्यापाऱ्यांचा फायदा, सद्यस्थितीतील पीकपद्धती, शेतमालाची उत्पादन क्षमता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, कांद्याला मिळणारा उत्तम दर, उच्चप्रतीचा कांदा लागवडीसह साठवणूक यांसह इतर विषयावर मार्गदर्शक तत्वानुसार चर्चा करण्यात आली. यावेळी बाजार समिती मधील विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती केंद्रीय पथक अधिकाऱ्यांना दिली. तत्पूर्वी बाजार समितीच्या वतीने केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सचिव चंद्रशेखर बिराजदार, नामदेव शेजाळे, सचिन ख्याडे,महिबूब शेख,रजपूत यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

दिल्लीच्या केंद्रीय पथकाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाजाची पाहणी केली..

केंद्रीय पथक समिती सदस्यांनी सोलापूर बाजार समिती मधील सद्यपरिस्थिती बद्दल आढावा घेतला. तसेच अडते आणि खरेदीदार व्यावसायिक यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली. बाजार समितीबाबत योग्य ती प्रतिक्रिया शासन स्तरावरून कळविण्यात येणार आहे. भविष्यात कांदा उत्पादक शेतकरी, कांदा अडते आणि व्यापारी यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावरून राहणार आहे.

– मोहन निंबाळकर, प्रशासक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *