आदिवासी पारधी समाजाचे मंत्री विजयकुमार गावित यांना निवेदन ,
केंद्र सरकारच्या नीती आयोग अंतर्गत योजनांचा मिळवून द्यावा लाभ…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दी १० जुलै – महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या विविध समस्या बाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सदर बाब निदर्शनास आणून दिली. लोकसभेच्या निवडणुकांमुळे तसेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध विकासकामे थांबली होती. त्याबाबत दिनांक ९/७/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाज हा बराच तालुक्यात व ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरवस्था झाल्याने त्यांना रोजी रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी नीती आयोग अंतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेला पॅटर्न प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार, तरुण,तरुणी,महिलासाठी व्यवसायासाठी मळणी यंत्र,मिनी ट्रॅक्टर,ऑटो रिक्षा,हॉटेल ढाबा व्यवसाय,अशा विविध योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावून पारधी समाजाचा जटील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करून निवेदन दिले.
दरम्यान यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी सदर प्रश्न लवकरच लक्ष घालून मार्गी लावणार असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, सरपंच भूषण चव्हाण, बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार, सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते.