महागाईच्या आगीत खाद्य तेलाचा भडका ; आयात शुल्क वाढल्याने खाद्य तेलांच्या दरात २० टक्के वाढ…!
सणासुदीच्या तोंडावर सर्व सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर दि. १९ सप्टेंबर – एकीकडे अन्न, धान्य आणि भाजीपाल्यांचे दर वाढत असताना, आता खाद्यतेलाचे ही दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. केंद्रसरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाद्यतेलाचे भाव चांगलेच वाढले आहेत.
सरकारने विविध खाद्यतेलांवरील शुल्क २० टक्क्यानी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खाद्य तेलांच्या दरामध्ये सुमारे २० टक्के वाढ झालेली आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये तेलांच्या दरामध्ये वाढ झाल्याने सर्व सामान्य नागरिकांचे हाल बेहाल झालेले आहेत.
खाद्य तेलांचे भाव वाढविण्यासाठी सरकारने शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या १५ लिटर डब्याच्या दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. सुप्रीम तेलाच्या बॉक्सची किंमत सुमारे १३०० रू इतकी झाली आहे. तर एका लिटर मागे सुमारे ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
भविष्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता.
केंद्र सरकारने खाद्य तेलांच्या आयात शुल्कमध्ये २० टक्के वाढ केल्याने खाद्य तेलांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.एका रात्रीत हे दर वाढल्याने ग्राहकांना सांभाळने जिकरीचे जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात शुल्क वाढल्याने भविष्यात दर आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– विजय परदेशी , तेल विक्रेते चौपाड.
खाद्य तेलांच्या दरामध्ये वाढ झाल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले.
केंद्र सरकारने खाद्य तेलांच्या आयात शुल्क आकारणीत एकदम वाढ केली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही दरवाढ केल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने सणात अचानक वाढ करणे चुकीचे आहे. सरकारने अन्न, धान्य आणि तेलांचे दर किमान ठेवावेत. हीच सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
– संजय पाटील , ग्राहक.
खाद्यतेलांचे किती वाढले दर ?
सरकी तेल – आता १३४ रू किलो / पूर्वी ११० रू किलो.
सूर्यफूल तेल – आता १३८ रू.किलो / पूर्वी १२० रू किलो.
सोयाबीन तेल – आता १३४ रू.किलो / पूर्वी ११० रू किलो.
शेंगा तेल – आता १६० रू.किलो / पूर्वी १५० रू किलो.