कारहुनवी सणानिमित्त कुंभारवेस मधला मारुती बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ….
लाडक्या बैल जोडीला सजवण्यासाठी केली विविध साहित्याची खरेदी…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक :- काळ्या शेतात राबणाऱ्या राजा सर्जा बैल जोडीचा प्रमुख असणारा कारहूनवी सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त शहरातील कुंभारवेस मधला मारुती आदी बाजारपेठा सणाला लागणाऱ्या विविध साहित्यांनी सजले आहेत. करहूनवी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लाडक्या बैल जोडीला सजवण्यासाठी सुती दोरा काळा रेशम रंगीत रेशम कंडेगोंडे मोरकी व्यसन बोरकडे कमरी मोरकुंजा आदींसह रंग आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगल्या प्रमाणात झाल्याने बळीराजा विविध साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाला आहे. सोलापूरसह आसपासच्या गावातील शेतकरी सुतीदोरा रेशम कंडेगोंडे आणि रंगवण्यासाठी कलर आदींची खरेदी करत आहेत यंदाच्या वर्षी साहित्यांचे दर स्थिर असल्याने बाजारपेठेत शेतकरी ग्राहकांचा खरेदीसाठी कल वाढलेला आहे. दरम्यान सणानिमित्त बाजारात वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. प्रत्येक दुकानात शेतकरी खरेदीसाठी दाखल झालेला दिसत आहे. मागील वर्षी म्हणावा तसा व्यवसाय झाला नाही अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली मात्र यंदाच्या वर्षी शेतकरी खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजारपेठेत ऊर्जितावस्था दिसून आली आहे.
सणानिमित्त लागणारे विविध साहित्य आणि त्यांचे दर
# सुती दोरा १०० रुपये किलो
# रंगीत रेशम १८० रुपये किलो
# काळा रेशम १२० रुपये किलो
# मोर्की ४० ते ८० प्रती नग
# वेसण २० ते ४० प्रती नग
# बोरकड २० ते ४० प्रती नग
# मोरकुंजा २८०० दोन जोडी
# कमरी २० ते ४० प्रती किलो
सध्या बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. यंदा पाऊसमान चांगल्या प्रमाणात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.त्यामुळे खरेदीला गर्दी होत आहे. वस्तूंचे दर सध्या स्थिर आहेत. मागील वर्षी वाढ झालेली होती.
( सुनील खंडेलवाल,विक्रेते )
पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने शेतात पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे बैलांना सजविण्यासाठी बजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलो आहे. दोरा आणि कंडेगोंडे वेसण एसुर खरेदी केला आहे.
( शेतकरी )