साऱ्या जगाचा जगद्गुरु एकमेव भारतच !
संतांचा व शिवयोगींचा वैभवशाली इतिहासामुळे भारताला जगद्गुरुचे स्थान – काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी
काशी जगद्गुरूंच्या हस्ते श्री संत शिवदास कृत सिद्धराम चरित्र ग्रंथाचे थाटात प्रकाशन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ मे
अष्टसिद्धी प्राप्त झालेले हे शिवयोगी श्रीसिद्धरामेश्वर आहेत. सिद्धरामेश्वर हे साक्षात शिवाचे अवतार असून त्यांची महिमा अपरंपार आहे. त्यांनी बालपणी मल्लिकार्जुन यांच्याशी संवाद साधला. मल्लिकार्जुन श्रीशैल डोंगर सोडून आपल्या भक्तासाठी सोलापुरात आले. म्हणून सोलापुर साक्षात श्रीशैल झाले आहे. मुक्तीसाठी देवदर्शनासाठी सोलापूर हे तीर्थक्षेत्र बनले आहे. आपला भारत देश हा अनेक संत महात्मे आणि जगद्गुरु यांचा बनलेला आहे. संतांची भूमी ही तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावते. त्यामुळे भारत हा सर्व जगाचा जगतगुरु म्हणून प्रसिद्ध झाला आहे. भारत तसेच महाराष्ट्र आणि त्यामध्ये येणारे सोलापूर हे एक अनन्यसाधारण असे तीर्थक्षेत्र बनले आहे. जिथे जिथे संतांचा वास असतो ते स्थळ तीर्थक्षेत्र बनते. सोलापूरच्या पावन नगरीत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म झाला. सोलापूरकरांना साक्षात भू कैलास प्राप्त झाले. देवदर्शनासाठी लोकांना कोठे ही जाऊ नये म्हणून सिद्धरामेश्वरांनी शहरात ६८ शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे सोलापूर हे भू कैलास म्हणून पावन झाला. श्रीसिद्धरामेश्वरांचे चरित्र कळण्यासाठी कवी शिवदास यांनी मराठीत चरित्र अनुवादन केले. कर्नाटकटातील गुंटूरमध्ये देखील श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर आहे. सिद्धरामेश्वर महाराजांची महिमा लोकांना कळेल त्यांचे विचार प्रसिद्ध व्हावेत. सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून सिमित ठेवू नका, सर्वांना वाटले पाहिजे की, सिद्धरामेश्वर हे विश्वाराध्य आहेत. सर्वदूर पोहोचले पाहिजे. श्रीसिद्धरामेश्वर यांचे महत्व कळावे, यासाठी सर्व विद्वानांना एकत्रित करून सिद्धरामेश्वर महाराजांच्या आचार विचारांचे मंथन करावे असे आदेश देत आहोत. बहुजन हिताय बहुजन सुखाय पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला असून, या ग्रंथांचे घराघरात पारायण करण्यात यावे. दिव्य सोलापुरात आणखीन असेच पवित्र कार्य घडावेत, असे आशीर्वचन काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रंथ प्रकाशन समारंभात केले. श्री संत शिवदास कृत श्री सिद्धराम चरित्र ग्रंथ प्रकाशन समारंभास श्री काशी जगद्गुरु यांचे दिव्यसानिध्य लाभले.
श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात महानंदा मल्लिनाथ टेंगळेस्वामी परिवार आयोजित आलेल्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात काशी जगद्गुरु बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, विजय महातेंश्वर शिवाचार्य महास्वामी, मनीकंठ दहिवडकर शिवाचार्य महास्वामी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, ग्रंथ प्रकाशक आणि आयोजक मल्लिनाथ टेंगळे स्वामी, महानंदा टेंगळे स्वामी, वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक अनिल सर्जे, सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ सुरेश स्वामी, आदींची उपस्थिती होती. ग्रंथ प्रकाशन समारंभाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशक तथा आयोजक महानंदा मल्लिनाथ टेंगळे स्वामी यांच्या श्री संत शिवदास कृत श्री सिद्धराम चरित्र या महाग्रंथाचे प्रकाशन श्रीकाशी जगद्गुरूंच्या अमृत हस्ते मोठ्या प्रसन्नतेच्या वातावरणात करण्यात आले. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ इरेश स्वामी सिद्धरामेश्वर पुराण कथासागर चे प्रकाशन देखील जगद्गुरूंच्या हस्ते करण्यात आले.
तद्नंतर कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पावन चरित्राचे पारायण करावे, असा संदेश उपस्थित भक्तगणांना दिला. तसेच विजयपूर तालुका चडचण येथील चरमुर्ती मठ हवीनाळ मठाचे विजय महांतेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी देखील आपले आशीर्वाचन देताना शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पावन सोलापूर नगरीचे वैभव अधोरेखित करत सिद्धरामेश्वर महाराजांच्या धार्मिक व आध्यात्मिक अष्टसिद्धीचे वर्णन करत चरित्र आणि ग्रंथ प्रकाशन समारंभाचे कौतुक केले. त्याच पद्धतीने श्रीमणिकंठ दहिवडकर शिवाचार्य महास्वामी यांनी देखील आपले मौलिक विचार व्यक्त करताना, श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाजउपयोगी कार्याची महती विशद केली. सिद्धरामेश्वर महाराजांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने समाजाचे हित जोपासले, म्हणूनच ते सिद्ध कुलचक्रवर्ती शिवयोगी बनले. माणसाने देखील याच चरित्राचे पालन करून आपले जीवन सफल करावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. ईरेश स्वामी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या पुस्तकाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना श्री सिद्धेश्वर महाराजांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. महाराजांच्या भक्तांमध्ये एक वेगळ्या प्रकारची अनुभूती प्राप्त होते. ती सर्वत्र पसरलेली आहे. महाराजांचे वचन आणि आचार विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम घेणे आवश्यक आहे. सिद्धरामेश्वर महाराजांचे विचार कन्नड भाषेत असून त्याचे अनुवाद मराठीत करून ते समाज उद्धारासाठी तयार केले पाहिजेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी या धार्मिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध वाडकर यांनी केले तर सूत्रसंचालन बळसुरे यांनी केले. यावेळी उर्मिला टेंगळेस्वामी, राजशेखर टेंगळेस्वामी, सुरेखा टेंगळेस्वामी, चंद्रशेखर टेंगळेस्वामी, शांता टेंगळेस्वामी, नागेश टेंगळेस्वामी आदींसह सिद्धरामेश्वर भक्त आणि टेंगळेस्वामी व गणेचारी स्वामी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
ग्रंथ प्रकाशनसाठी दोन वर्षांचा कार्यकाळ लागला…
पुरातन काळातील श्री संत शिवदास कवी सादर श्री सिद्धराम चरित्र या ग्रंथाचे कन्नड मधील अनुवाद मराठीत करण्यासाठी दोन वर्षांचा कार्यकाळा लागला. ग्रंथाचे संपूर्ण आकलन आणि संकलन करून त्याचे अनुवाद करण्यात आले. हा ग्रंथ पुरातन काळातील असून त्याचे पावित्र्य कायम आहे. या ग्रंथाच्या पारायणाने नक्कीच अनेक माध्यम साध्य होतात. त्याचे ज्वलंत उदाहरण आमच्या परिवारात दिसून येते. त्यामुळे सर्व भक्तांना या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी मराठी मध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे.
महानंदा मल्लिनाथ टेंगळे स्वामी, प्रकाशक तथा अनुवादक
काशी जगद्गुरूंच्या हस्ते नवयुवक लोधी समाज सामुदायिक विवाह संस्थेचा सत्कार संपन्न..
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची प्रेरणा घेऊन शहरातील लोधी समाजाच्या वतीने २००९ सालापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री काशी जगद्गुरूंच्या हस्ते नवयुवक लोधी सामुदायिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले यांचा विशेष असा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी जगद्गुरुंनी शुभशीर्वाद प्रदान केले.