“जय भाऊंची” रणनीती “दोन दादांची व्ह्यूरचना”अन् भाजपाचा अटकेपार झेंडा
भाजपची मास्टरमाइंड खेळी विरोधकांच्या पथ्यावर

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१६ जानेवारी
सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विरोधकांना चितपट करत अटकेपार झेंडा रोवला आहे. तब्बल नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने साऱ्याच नेत्यांची शक्ती पणाला लागली होती. विशेषतः पालकमंत्री जया भाऊंनी बालाजी सरोवर येथून सूत्र हाती घेतले होते. तर समर्थ नगरीच्या दादांसह शहरातील दादांनी राधाश्री येथून योग्य रीतीने व्ह्यूरचना आखत सोलापूर महापालिका निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. स्वबळावर ७८ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत पाच माजी महापौर आणि तीन उपमहापौर यांचा दारुण पराभव झाला. अनेक माजी नगरसेवकांना घरी बसावे लागले. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या नवख्यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली आहे. त्यामुळे जया भाऊंसह सचिन आणि देवेंद्र दादांच्या जोडीने करिष्मा घडवल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
दरम्यान, इच्छुकांच्या मुलाखतीपासून ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या गोठात खळबळ होती. निष्ठावंतना डवल्याने उत्तर दक्षिणमध्ये नाराजीचा सूर होता. अनेक कार्यकर्त्यांना नाईलाजाने पक्षाचा आदेश म्हणून उमेदवारी मागे घ्यावी लागली. तर काहींनी बंडखोरी करत दंड थोपटले. परंतु या सर्वांचा परिणाम अश्वमेधच्या आश्वाप्रमाणे भाजपच्या विजयी घोडदौडीला बाधक ठरला नाही. याउलट भाजपाच्या शहरातील जागांचा टक्का वाढलेला दिसून आला. नगरपालिका नंतर महानगरपालिका मध्ये देखील भाजपाने करिष्मा घडवल्याने सर्वत्र विजय जल्लोष साजरा केला जात आहे.


सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निवडणूक अब की बार 75 पार हा दिलेला नारा तंतोतंत खरा ठरला आहे. या विजयाचे किंगमेकर, हिरो आणि शिल्पकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे हे ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधान मतदारसंघात निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत ठरले. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी पदभार घेतल्यानंतर जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हा त्रिकोण तयार झाला.

तेव्हापासून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात झाली परंतु पक्षातीलच ज्येष्ठ आणि आम्हीच पक्षाचे मालक म्हणणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात खूपसू लागले त्यांनी इतरांसमोर बालक आमदार म्हणून हिणवत होते. पण काही करून या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय मिळवून आणायचा असा चंग गोरे, कल्याणशेट्टी आणि कोठे यांनी बांधला होता.


त्यासाठी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेला फोडले. ज्या ठिकाणी भाजप कधीच निवडून आला नाही अशा ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसू लागले आहेत. ज्याने बालक म्हणून हिणवले त्यांना या भव्य दिव्य भाजपच्या विजयाने चांगलेच उत्तर मिळाले आहे.