पालकमंत्र्यांनी काढला मालकांचा रुसवा ; कालचे वक्तव्य मागे घेत असल्याचे मालकांनी केली मान्य

गैर समजूती मधून घडला सारा प्रकार वादावरती टाकला पडदा ; पालकमंत्री म्हणाले, मी खूप लहान कार्यकर्ता नाराज होण्याचा त्यांचा अधिकार

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.२७ डिसेंबर
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पक्ष बदलाचे जोरात वारे वाहू लागले होते. भाजपच्या स्थानिक आमदारांना डावलून पालकमंत्र्यांनी इतर पक्षातील माजी नगरसेवकांना तसेच इच्छुकांना भाजप प्रवेश दिल्याने भाजपचे जेष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख दुखावले गेले होते. इच्छुकांच्या घाऊक इनकमिंगमध्ये आपला कार्यकर्ता मागे पडत असल्याचे त्यांना दिसल्यानंतर शेवटी मालकांनी पक्षश्रेष्ठी तसेच प्रसारमाध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली. त्याला दुजोरा म्हणून बापूंनी मालकांच्या घरी भेट घेऊन मालकांच्या तोंडच्या शब्दाला सहमती दर्शवत कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करण्याचे जाहीर केल्याने भाजप पक्षश्रेष्ठींची पळता भुई थोडी झाली… पालकमंत्र्यांना तातडीने मुंबईला येण्याचे फरमान धाडण्यात आले. त्यावर पालकमंत्र्यांनी थेट विमानातून मुंबई गाठली. लागोलागल इतर पदाधिकारी यांनी देखील मुंबई दौरा केला. प्रदेशाध्यक्षांनी सूचना केल्या. त्या सूचना शरसंवाद मानून पालकमंत्र्यांनी पुन्हा सोलापूर तळ ठोकला. पक्षावर तसेच घाऊक इनकमिंग वर नाराज असलेल्या देशमुखांची नाराजी दूर केली. बालाजी सरोवर प्रीमियर येथे तगडी बैठक घेऊन चर्चा विनिमय संपन्न झाली. स्थानिक आमदारांच्या निर्णयात कोणतीही ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मालकांनी बंडाची तलवार म्यान केली आहे.

प्रसारमाध्यमांची संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, सोलापूर शहरात भाजप मजबूत आहे. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी सोलापुरात भाजपचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यांच्यामुळे सोलापुरामध्ये पक्ष आणि कार्यकर्ता मजबूत ताकदवर आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघ निहाय उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक आमदारांना दिलेले आहेत. शहर उत्तर मध्य आणि दक्षिण या तिन्ही मतदारसंघातील उमेदवार निवडीचे अधिकार त्या त्या आमदारांना दिले आहेत. परंतु उत्तर आणि मध्य तसेच दक्षिण मतदारसंघांमध्ये एकमेकांचे उमेदवार उमेदवारी मागत आहेत. अशावेळी तिन्ही आमदारांमध्ये समन्वय असावा यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे समन्वय साधण्यासाठी त्यावर तोडगा काढण्यासाठी मी उपलब्ध असणार आहे. मात्र अंतिम उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. एकनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळेल यात शंका नाही. मात्र काही ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी इतर उमेदवारांना देखील उमेदवारी दिली गेली पाहिजे असे माझे मत आहे. मात्र त्यावर मार्ग निघेल त्यासाठी योग्य रणनीती ठरवली जातील. असे देखील गोरे यांनी सांगितले.
महायुती संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, महायुतीसाठी भाजप नेहमी तयार आहे. तसा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आलेला आहे. मजबूत जागेवर दावा केल्यास ती जागा सोडता येणार नाही. मात्र युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अजित पवार यांचा राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रश्न नाही. कारण त्यांचा तसा प्रस्तावच आलेला नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपला फॉर्मुला ठरवला आहे असे सांगितल्यानंतर पालकमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हणाले, त्यासाठी त्यांच्याकडे तेवढे उमेदवार पाहिजेत. त्यांच्यावर तेवढे उमेदवार आल्यानंतर आपण त्यावर चर्चा करू.
शिष्टाई माझ्या अंगात आहे स्वच्छ निष्कलंक असे राजकारण माझे आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी झाल्यास त्या दुसऱ्यांच्या नावे पडतील. मात्र वाईट गोष्टी झाल्यास माझेच नाव पुढे येईल असे देखील ते म्हणाले.