सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडून भाजपला दिला घरचा आहेर

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.२७ डिसेंबर
आगामी सोलापूर महापालिका निवडणूक वादळी ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. सत्ताधारी भाजप पक्षातील अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर आले आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी अनेक आयाराम गयारामांना भाजप प्रक्ष प्रवेश दिल्याने भाजपचे जुने दोन जेष्ठ आमदार नाराज झाले आहेत. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत नवी आघाडी उघडली आहे. माझ्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी मिळत नसेल, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहीन, मग तो कार्यकर्ता कोणताही पक्षात जाऊ दे! मी त्याचा प्रचार करेन अशी गर्जना मालकांनी केल्यानंतर गल्ली ते दिल्लीचे राजकारण पूर्ण हादरून गेले आहे. यानंतर बापूंनी तातडीने मालकांची भेट घेत मन वळवण्याचा प्रयत्न केला. काही काळ तो यशस्वी झाला. परंतु पुन्हा आज सकाळी मालक राजीनामा देणार असल्याच्या आरोळ्या उठत असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने संपर्क साधण्यात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापूंकडे पक्षातील घाऊक इनकमिंग बाबत नाराजी व्यक्त करताना कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याच सांगितले. आमदार सुभाष देशमुख यांनी देखील याच मुद्द्यावर भाष्य करताना आम्ही दोघे देखील निष्ठावंत कार्यकर्तेच्या पाठीमागे उभे राहू असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. यासाठी भाजपचा अस्त्रानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे , आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना तातडीने मुंबईला बोलवून घेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये नेमके काय घडते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.