मित्राच्या भाजप प्रवेशाला स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध ; हेतू पुरस्कार आंदोलन केल्याची दबक्या आवाजात चर्चा 

मित्राच्या भाजप प्रवेशाला स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध ; पालकमंत्र्यांच्या ऑपरेशन लोटसला बसला जोरदार धक्का 

हेतू पुरस्कार आंदोलन केल्याची दबक्या आवाजात चर्चा…

 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून चार माजी आमदार भाजप प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ऑपरेशन लोटस जोरदार सुरु आहे. मात्र भाजपच्या ऑपरेशन लोटस विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनीच हे आंदोलन करावयास लावले अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना तीव्र शब्दांत विरोध केला असून कलंकित भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात स्थान नको अशी ठाम भूमिका मांडली आहे.

 

भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी आमदार दिलीप माने हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. दिलीप मानेंचं नाव न घेता जबरदस्त विरोध करत भाजपमधील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला भाजपमधून विरोध होत असल्याने राज्यातील भाजपला जबर धक्का बसला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते आणि चार माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे व त्यांचे दोन सुपुत्र, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही दिवाळीनंतर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली आहे. इतर पक्षातून आयात झालेले नेते भाजपात आल्यावर जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार, अशी खंत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली आहे.

 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस राबवत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा आहे. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे वर्चस्व आहे. दिलीप मानेंच्या पक्ष प्रवेशामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांना जड जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय केला आहे, आता आम्ही त्यांच्याच दावणीला बांधले जाणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलनात केली आहे.

पालकमंत्र्यांच्या मित्राला स्वकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मोठी गोची निर्माण झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिलीप माने यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या माध्यमातून दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशा अगोदरच भाजप पक्षामध्ये त्यांच्या प्रवेशावरून विरोध वाढला आहे. दक्षिण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारल्याने प्रवेशाचा विषय गंभीर बनलेला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *