भाजपच्या पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस..
पक्षाला न विचारता भूमिका जाहीर केल्याने मागवला खुलासा….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २१ सप्टेंबर – भारतीय जनता पार्टीकडे सोमेश वैद्य यांनी (दि.१५) सप्टेंबर रोजी इच्छुक उमेदवार म्हणून लेखी अर्ज पक्षाकडे सादर केला. त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक पक्षनेता श्रीनिवास करली, माजी नगरसेविका, राजश्री चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड, राजश्री पाटील-बिराजदार, जुगुनबाई आंबेवाले यांनी लेखी शिफारस केलेली आहे, याबाबत पक्ष संघटनेला न विचारता त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले, त्याबाबत त्यांना पक्ष संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे माजी उपमहापौर राजेश काळे हे वारंवार प्रिंट मिडिया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष विरोधी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहे. त्यांनाही अश्याच प्रकारची नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा आल्यानंतर प्रदेश स्तरांवरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. सदरची कारणे दाखवा नोटीस शहर अध्यक्ष नरेंद्र गोविंद काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी , रोहिणी तडवळकर , विशाल गायकवाड, नारायण बनसोडे यांच्या सहीनिशी काढण्यात आली आहे.
मनमानी कारभाराला कंटाळून निर्णय..
पक्षातील वरिष्ठ नेत्यावर नाराजी व्यक्त करत आम्ही वैद्य यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वरिष्ठ नेत्यांसह त्यांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षामध्ये मनमानी कारभार चालला आहे. प्रत्येक विकास कामांमध्ये टक्केवारीची भाषा केली जाते. स्वतःचे घर जाळून सामाजिक कार्य करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे नाईलाजस्तव हा निर्णय घेतला आहे. आमची मागणी रास्त असताना त्यावर कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, आणि त्याबाबतचा आमचा खुलासा आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना केला आहे.
– नाराज माजी नगरसेविका