भाजपच्या नगरसेवकांनी फडणवीसांना पाठवले हे पत्र ; देवेंद्रांना केला विरोध
देवेंद्र कोठे यांना भाजपमधूनच विरोध निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याचे केली मागणी…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र कोठे हे इच्छुक आहेत. मात्र या ठिकाणी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, काही महिन्यापूर्वीच प्रवेश झालेल्या देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मधील आणि त्यासोबत त्यांच्या प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपासाठी वातावरण निर्मिती केली होती. महिलांचे संघटन करून नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी मोठी यंत्रणा कोठे यांनी उभी केली होती. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून शहर मध्य मध्ये देवेंद्र कोठे यांना संधी मिळेल असे वातावरण सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पद्मशाली समाजाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट आणि चर्चा घडवून आणण्यामध्ये देवेंद्र कोठे यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयातून अनेक प्रयत्न केले जात होते.