भाजपच्या नवीन इनकमिंगला बाळे-केगावच्या निष्ठावंतांचा विरोध
भाजप कार्यालयासमोर दक्षिणनंतर उत्तरच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ४ नोव्हेंबर-
शहर भाजपमध्ये नव्याने प्रवेश देण्यात आलेल्या इतर पक्षीय नेते-पदाधिकाऱ्यांना बाळे, केगाव परिसरातील (प्रभाग क्रमाक ५ मधील) भाजपाचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करीत आपल्या मागण्यांचे एक निवेदन शहर भाजपा अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना दिले. प्रभाग क्रमांक पाच मधील माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा थेट भाजपा कार्यालयाकडे वळून आपल्या भावना शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांची भेट घेऊन मांडल्या आणि एक निवेदन
दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, बाळे आणि केगाव परिसर १९९२-९३ साली हद्दवाढ शहरामध्ये समाविष्ट करण्यात आला असून, त्यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकत नगण्य असताना २००७ साली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी उमेदवारास ९५ मते मिळाली होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पक्ष संघटना वाढीस काम करत आज बाळे व परिसर भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. गेली तीन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातत्याने भाजपास लीड देण्याचे काम या भागातील मतदारांनी केले असून, आज भाजपा बाळे व परिसरात नंबर १ चा पक्ष असून, अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना काम करीत असताना येथील प्रस्थापित काँगेस व राष्ट्रवादी काँगेस शिवसेना (उबाठा) या लोकाकडुन भाजप पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. खोटया केसेस मध्ये गुंतवण्याचे काम केले.
आता शहर भाजपात त्याच लोकांना पक्ष प्रवेश दिला, हे खेदजनक आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कारण की, जे लोक गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द बोलले; त्याच लोकांना आज पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे भाजपा कार्यकर्ता खचून गेला असून, आम च्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.