मोटरसायकली चोरायचा अन् स्क्रॅप करून विकायचा ;  इंजिनिअर लेकासह भंगारवाला बापाचा गोरखधंदा आला उजेडात 

मोटरसायकली चोरायचा एन स्क्रॅप करून विकायचा ;  इंजिनिअर लेकासह भंगारवाला बापाचा गोरखधंदा आला उजेडात…!

सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेत जप्त केला सुमारे २ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल 

“स्क्रॅप दुकान चालवणाऱ्या त्या बापासह सराईत सिव्हिल इंजिनिअर चोरट्याचा कारनामा शहरातून चोरल्या होत्या तब्बल ११ मोटरसायकली”

“तीन मोटरसायकलींचे आपल्याच वडिलांच्या दुकानात स्क्रॅप करून स्पेअर पार्टची केली होती विक्री”

“शहरातून चोरलेल्या मोटरसायकली शहरालगत असणाऱ्या गावागावात नेऊन विकण्याचा नवीन सुरू केला जातोय जुगाड का धंदा सुशिक्षित तरुणांना पडतेय दोन नंबर पैशांची भुरळ”

“आरोपीच्या वडिलांसह एक कामगार आणि गुडलक ट्रेडर्सचे मालक यांचे बॅडलक होणार अटकेची कारवाई”

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.११ ऑगस्ट

सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. त्याअनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सदर बाझार ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला याबाबत तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बाझार पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि त्यांच्या वेगवेगळ्या तीन पथकांनी आरोपींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. याच टप्प्यावर पोलिसांच्या पथकाला ( दि.६ ) ऑगस्ट रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विशाल बोराडे आणि हनुमंत पुजारी यांना एक संशयित व्यक्ती हरीभाई देवकरण प्रशाले मागे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हिरो फॅशन मोटरसायकल क्रमांक एमएच १३ डीएफ ७३०४ ही संशयितरित्या घेऊन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोकेशन आणि मोबाईल ट्रेसिंग करून त्या संशयित आरोपीचा पाठलाग करून शिताफीने पकडण्यात सदर बाझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले.  साहिल महेबूब शहापुरे (वय २२) रा.३३३ दक्षिण सदर बाजार अशोक नगर मुर्गीनाला जवळ सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे पोलिसांनी.अधिक चौकशी केली असता त्याने ही मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन पंचासमक्ष पंचनामा करून मोटरसायकल गुन्ह्यातील इतर ११ मोटरसायकली असा एकूण २ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन मोटरसायकली या स्क्रॅप स्वरूपात आहेत. तर स्क्रॅप केलेल्या मोटरसायकलींचे काही भाग शहरातील स्पेअर पार्ट विक्रेत्यांकडे विकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

      दरम्यान, मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल महेबूब शहापुरे ( वय २२) याला यापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायदंडाधिकारी शिंदे यांच्यासमोर हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली होती. आरोपीकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरी केलेल्या आणखीन मोटरसायकलीची माहिती प्राप्त होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्याची मागणी सदर बाझार पोलिसांनी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे केली होती. पोलिसांची ही मागणी न्यायालयाने मान्य करत, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायदांडाधिकारी शिंदे यांनी आरोपी साहिल शहापुरे याला आणखीन वाढीव दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करत आरोपीच्या मुस्क्या आवळण्याची ही कौशल्यपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रॅक्टिकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे, पोलीस हेड.कॉ शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, पोलीस हवालदार संतोष पापडे, सागर सरतापे, एजाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, हनुमंत पुजारी, विशाल बोराडे, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सागर सरतापे हे करीत आहेत.

 

} शहरातून मोटरसायकली चोरी करून त्या शहरालगत असणाऱ्या गावागावात नेऊन विकण्याचा धंदा सुशिक्षित तरुणांनी सुरू केलेला दिसत आहे. शहरात चोरलेली मोटरसायकल ही गावांमध्ये सहजपणे विकली जाते. शेतापासून ते घरापर्यंत जाण्यासाठी शेतकरी कमी किमतीत मिळालेल्या या मोटरसायकली विकत घेतात. परंतु त्यांना याबाबत संपूर्ण माहिती नसते. आपण चोरीची मोटारसायकल घेत आहोत. त्या मोटरसायकलला नंबर प्लेट सुद्धा नसते. त्यामुळे शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले.

} संशयित आरोपी साहिल शहापुरे हा सिव्हील इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. शिक्षण घेता घेता त्याला मोटरसायकल चोरीचे वेड लागले. शहरात आत्तापर्यंत विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या सातहून अधिक मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे हा सराईत आणि रेकॉर्डवरील मोटरसायकल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

} आरोपी साहिल महेबूब शहापुरे याने चोरी करून आणलेले मोटरसायकली आपल्या वडिलांच्या म्हणजेच महेबूब शहापुरे यांच्या स्क्रॅप दुकानात स्क्रॅप करायचा. त्याला महेबूब उर्फ बाबू बागवान हा त्यांचा कामगार मदत करायचा. शहरातून चोरलेली प्रत्येक मोटरसायकल ही स्पेअर पार्ट वेगळी करून शहरातील गुडलक ट्रेडर्स या दुकानात नेऊन विकायचा. या दुकानाचे मालक रहीम इरफान शेख चोरी केलेल्या मोटरसायकलचे स्पेअर पार्ट विकत घ्यायचे. या सर्व गोष्टी माहीत असून देखील इतर तिघांनी या गुन्ह्यात समप्रमाणात सहभागी होऊन आपला गोरख धंदा राजसपणे सुरू ठेवला होता. 

} पोलीस तपासाच्या टप्प्यावर चोरीच्या मोटरसायकली स्क्रॅप करून स्पेअर पार्ट विक्रीच्या घटना समोर मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला सहकार्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने लवकरच इतर तीन संशयित आरोपी महेबूब शहापुरे, कामगार महेबूब उर्फ बाबू बागवान, आणि गुडलक ट्रेडर्स या स्पेअर पार्ट दुकानाचे मालक रहीम इरफान शेख यांना देखील ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

} सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत ६ , एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत २, फौजदार चावडी पोलीस ठाणे अंतर्गत १ , जनरल पोलीस ठाणे अंतर्गत १ आणि इतर १ असे एकूण ११ मोटरसायकल चोरीच्या प्राप्त झालेल्या ११ तक्रारीनुसारसदर बाझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *