महात्मा बसवेश्वरांचा पुतळा चबुतऱ्यावरून हलवला ; ७५ लाखांच्या निधीतून होणार सुशोभीकरण…
बसवकल्याणच्या धर्तीवर महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यासह परिसराचा विकास
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१९ मे
कर्नाटकातील बसवकल्याण येथील प्रवेशद्वाराच्या धर्तीवर सोलापुरातील कोंतम चौकातील श्री महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराचा विकास करण्यात येत आहे. सध्या या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसवप्रेमींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे काम पूर्णत्वास जात आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा काढण्याचे कामकाज सुरू होते. रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास याचे कामकाज सुरू झाले होते. मात्र पुतळ्याला कोणताही इजा होऊ नये, या अनुषंगाने पुतळा हलवण्याचे काम सुरू असलेले दिसून आले.
गेल्या २० वर्षांपासून या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. दरम्यान, वर्षभरापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३५ लाख आणि मुख्यमंत्री विशेष निधीतून ४० लाख रुपये, असा एकूण ७५ लाखांचा निधी मिळाला असून त्यातून बसवेश्वर महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी समाज बांधवांसोबत विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर कर्नाटकातील बसवकल्याण येथील प्रवेशद्वाराच्या धर्तीवर हा परिसर विकसित झाला पाहिजे, अशी मागणी समोर आली. त्यानुसार या परिसराचे काम सुरू करण्यात आले आहे.
पुतळा परिसरात होणार ही विकासकामे
# बसवकल्याणप्रमाणे कमान
# कमानीतून पुतळा स्पष्ट दिसण्यासाठी चबुतरा दोन फूट कमी करणार
# सुरक्षा भिंत कमी करणार
# पुतळा मजबुतीकारण
# संपूर्ण परिसरात हिरवळ होणार
# उत्सवानिमित्त कार्यक्रम घेण्यासाठी सोय
# महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे संकल्पचित्र
मुख्यमंत्री विशेष निधीतून पुतळा परिसराचा विकास
महात्मा बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून निधीअभावी हे काम रखडले होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि मुख्यमंत्री विशेष निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. बसवकल्याणच्या धर्तीवर हे काम सुरू आहे. आतापर्यंत १८ लाख रुपयांचे काम झाले आहे. तर उर्वरित काम जयंती उत्सवानंतर हाती घेण्यात येणार आहे.
विजयकुमार देशमुख, आमदार
बसवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण
सोलापूर शहरातील कौतम चौक येथे १९८५ रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन महापौर बंडपन्ना मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर २०२५ रोजी पुतळा परिसर सुशोभीकरण विकास काम होणार आहे. तब्बल ४० वर्षानंतर सदरचे विकास काम होणार असल्याने बसवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती पुतळा परिसर विकासकामाचे श्रेय फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाते
जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्या सभोवताल परिसराचे सुशोभिकरणाचे विकासकाम सुरू झालेले आहे. तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून सदरचे विकासकाम सुरू झालेले आहे. या विकासकामाचे श्रेय फक्त एकनाथ शिंदे यांनाच जाते. या सुशोभीकरण व विकासकामासाठी एकनाथ शिंदे यांनी सुमारे ७५ लाखांचा निधी सुपूर्द केला असून, त्यातील ४० लाखांच्या निधीतून विकास काम सुरू झालेले आहे. उर्वरित ३५ लाखाच्या निधीमधून संरक्षक भिंत तसेच इतर कामे केली जाणार आहेत. एकनाथ शिंदे स्वतः या कामाच्या उद्घाटनासाठी येतील, असा विश्वास त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळे तर कोणीही या विकासकामाचे श्रेय लाटू नये.
मनीष काळजे, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख