आषाढ निमित्त सिव्हील महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी ; मनोभावे दर्शन घेऊन आषाढाचा नैवेद्य केला अर्पण…

सिव्हीलच्या श्रीमहालक्ष्मी मंदिरात भाविकांची मांदियाळी

 मनोभावे दर्शन घेऊन आषाढाचा नैवेद्य केला अर्पण…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २८ जुलै – आषाढ महिन्यात सिविलच्या श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. दरवर्षी संपूर्ण महिना भाविक महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून मंदिरात दाखल होतात. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम महापूजा महाआरती संपन्न होते. तसेच आषाढातील शेवटच्या रविवारी सिव्हील परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी येतात.

                    त्याच पार्श्वभूमीवर रविवारी देविभक्त सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते. डोक्यावर जलकुंभ , कडुलिंब पाला , दहीभाताचा नैवेद्य , कांदा , पुरणपोळी असा नैवद्य देवीस अर्पण करण्यात आला. यावेळी देवीच्या मूर्तीस भरजरी वस्त्र आणि आभूषणे परिधान करण्यात आली होती. कपाळावर कुंकवाची मळवट भरल्याने देवीचे दर्शन घेऊन भाविक समाधानी झाले.

            दरम्यान पोतराज आणि हलगीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने भाविक भक्त दरवर्षी आपला नवस फेडण्यासाठी लोटांगण घालतात. अनेक महिला भाविकांनी यावेळी देवीचा नवस फेडण्यासाठी परंपरेनुसार डोक्यावर जलकुंभ घेऊन देवीचे दर्शन घेतले आणि लोटांगण घालून नवस पूर्ण केला. यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत आबालवृद्ध तसेच महिला भाविकांची मोठी रांग दिसून आली. संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होती.

सिव्हिलच्या श्रीमहालक्ष्मी मंदिराला देखील अनेक वर्षांची परंपरा…….

मुखदर्शन आणि धर्मदर्शन अशा दोन रांगांमधून भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. सिव्हिलच्या श्रीमहालक्ष्मी मंदिराला देखील अनेक वर्षांची परंपरा असून या आषाढ महिन्यात असंख्य भावीक भक्त देवीच्या दर्शनानासाठी मंदिराकडे येत असतात. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर आहे.

– संभाजी झिपरे , सिव्हील श्री महालक्ष्मी मंदिर पुजारी

मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीला लोटांगण घालून देवीचा नवस पूर्ण ………..

गेल्या अनेक वर्षांपासून श्री महालक्ष्मी मंदिरात नैवेद्य अर्पण करतो. या सिविलच्या लक्ष्मीला अनेक वर्षांची परंपरा असून सोलापूर शहरातील प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीला लोटांगण घालून देवीचा नवस पूर्ण केला जातो. असंख्य भाविक आषाढ महिन्यात नवस पूर्ण करतात.

– नवस केलेले भाविक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *