आषाढ आणि पोशम्मा सणावर दरवाढीचे सावट…
कोंबड्यांचा दर वाढल्याने जोडबसवान्ना बाजारात ग्राहकांची वर्दळ रोडावली…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जुलै – आषाढ आणि पोशम्मा या सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील जोडबसवान्ना चौक परिसरात कोंबड्याचा बाजार भरला आहे. या कोंबड्याच्या बाजारात जवारी प्रजातीचा कोंबडा विक्रीसाठी दाखल करण्यात आला आहे. मात्र दरवाढीमुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ रोडवल्याचे चित्र आहे.
हिंदू धर्मामध्ये आषाढ आणि पोशम्मा सणाचा उत्साह असतो. दरवर्षी शितलादेवी, सिव्हिल लक्ष्मी , मरिआई , तसेच मसोबा यांना नैवेद्य अर्पण केला जातो. कडुलिंबाचा पाला, दहीभात, लिंबू असा नैवेद्य दरवर्षी भाविक देवींना आणि म्हसोबाला दाखवत असतात. तसेच देवीच्या पायाखाली असणाऱ्या राक्षसांना देखील कोंबड्याचा आणि बोकडाचा नवीन दाखवला जातो. त्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी कोंबड्यांचा बाजार भरला जातो. मात्र जोडबसवान्ना चौक परिसरात भरणारा बाजार नेहमीच गजबजलेला असतो. विविध ठिकाणाहून आणलेले कोंबड्यांच्या बाजारपेठेत व्यापारी खरेदी विक्री करतात. मात्र यंदाच्या वर्षी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या घटली असल्याचे दिसून आले. झालेली दरवाढ यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदी करणे कमी केल्याचे दिसून आले.
दरम्यान सोलापूर शहरासह जिल्ह्यातील मोहोळ , दक्षिण, उत्तर , अक्कलकोट, माळशिरस, अकलूज , टेंभुर्णी, अशा विविध गावातून आणि तालुक्यातून कोंबडे विक्रीसाठी आणले जातात. शेतकऱ्यांकडून घाऊक दराने कोंबडे विकत घेऊन व्यापारी किरकोळ बाजारपेठेत व्यवसाय करतात. मात्र यंदाच्या वर्षी घाऊक दर वाढल्याने किरकोळ बाजारपेठेत देखील कोंबड्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
मोठ्या आकाराचा आणि वजनाचा कोंबडा एक हजार रुपये, तर कमी वजनाचा कमी आकाराचा कोंबडा चारशे रुपये प्रति नग असा बाजारपेठे दर सुरू आहे. पोशम्मा निमित्त कोंबड्यांचा दर यंदा वाढला असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ घटल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी मोठ्या प्रमाणात पोशम्मा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा पोशम्मा सणावर दरवाढीचे सावट दिसत आहे.
बाजारपेठेत ग्राहकांची संख्या घटल्याने म्हणाव तसा प्रतिसाद मिळत नाही….
शेतकऱ्यांनी कोंबड्यांचे दर वाढवल्याने दरामध्ये देखील दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. दरवाढीमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यवसाय म्हणावा तसा होत नाही. ग्राहक एकाच दराला अडून बसल्याने यंदा बाजारपेठेत व्यवहार योग्य प्रकारे होत नाही. ग्राहकांची संख्या यंदाच्या वर्षी कमी झाल्याने बाजारपेठेत यंदा उठाव कमी झाला आहे.
– अजीम शेख , विक्रेते.
दरवाढीमुळे खरेदीला आळा बसत आहे….
यंदाचा आषाढ आणि पोशम्मा महाग झाला आहे. पूर्वी कोंबड्याचे दर हे तीनशे रुपये पर्यंत असायचे, परंतु आता कोंबड्यांचा दर हा एक हजार रुपयापर्यंत गेला आहे. त्यामुळे पोशम्मा साजरा करण्यासाठी ग्राहकांनी प्रतिसाद कमी दिल्याचे जाणवत आहे. किमान तीनशे रुपये पर्यंत तरी दर असायला हवे आहेत.
– शरद बोड्डू , ग्राहक.