कांद्याचा वांदा मिटला…..!४७२ ट्रक मधून आला ४७ हजार २१६ क्विंटल कांदा
दर मिळाला किमान ३०० ते कमाल ४५२५ तर सर्व साधारण दर १८०० रुपये प्रति क्विंटल
राज्यामध्ये सोलापूर बाजार समिती कांदा दरात अव्वल !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ डिसेंबर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर, माथाडी कामगारांनी आपल्या आंदोलन मागे घेतले. त्यानंतर आज सोमवारी कांदा लिलाव सुरळीत झाला. पहाटे पाच वाजता कांद्याचा काटा करण्यात आला. त्यानंतर सकाळी दहा वाजता कांद्याचे लिलाव पार पाडण्यात आले. या लिलावात कांद्याला किमान ३०० ते कमाल ४५२५ तर सर्व साधारण दर १८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ४७२ ट्रक मधून सुमारे ४७ हजार २१६ क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता.
दरम्यान बुधवारपासून, बाजार समितीमध्ये मोठा गोंधळ सुरू होता. माथाडी कामगारांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचे जाहीर निषेध करण्यासाठी अचानक कामबंद आंदोलन केले. कामगारांनी पुकारलेल्या या कामबंद आंदोलनाचा शेतकऱ्यांसह मार्केट कमिटीवर परिणाम पडला. शेतकऱ्यांचा कांदा दोन दिवस बाजार समितीमध्ये पडून होता. शेवटी प्रशासक मोहन निंबाळकर यांनी माथाडी कामगार व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर कामगारांनी आपला बंद मागे घेतला. त्यानंतर आजपासून कांदा लिलाव सुरळीत सुरू झाला. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेला कांदा उतरवणे, कांद्याचा काटा करणे, लिलाव करून लोडिंग करणे या कामकाजासह सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता माथाडी कामगार कामावर रुजू झाले. दुपारपर्यंत ८० टक्के तर उर्वरित २० टक्के कांदा रात्री व्यापाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आभाळामुळे कांद्याची आवक वाढण्याची शक्यता.
बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव बंद होता. आज पासून कांदा लिलाव सुरळीत झाला आहे. कांद्याला दर देखील चांगला मिळत आहे. वातावरणात बदल झाल्याने, आभाळ येऊन कांदा खराब होऊ नये या भीतीपोटी शेतकरी बाजारपेठेत कांदा मोठ्या प्रमाणात आणत आहेत. इथून पुढे आवक वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दर मात्र स्थिर राहतील अशी शक्यता आहे.
– सादिक बागवान, अडत व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
राज्यामध्ये सोलापूर बाजार समिती कांदा दरात अव्वल
कामगारांनी अचानकपणे पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर आज मार्केट कमिटीतील कांदा लिलाव सुरळीत झाला. कांद्याला सर्वोत्तम दर मिळत आहे. सध्या राज्यात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळत आहे. लाल कांद्याला ३ हजार रुपये दर मिळत आहे. तर गर्वा कांद्याला ४५२५ इतका उच्चांकी दर मिळत आहे. लहान कांद्या देखील दोन हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. सर्व बाजार समितीमधील माहिती संकलित केली असता, सध्या राज्यामध्ये हा दर अव्वल मानला जात आहे.
– दत्तात्रेय सूर्यवंशी, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
कांद्याचा दर समाधानकारक
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर अखेर कांदा लिलाव सुरू झाला. कांदा लिलावात कांद्याला कमी दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु कांद्याला चांगला दर मिळाला आहे. लहान कांद्याला मागणी असल्यामुळे दर योग्य मिळाला.
– शशी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी.