सोलापूर बाजार समिती बनताहे समस्यांची कमिटी ; सभापती उपसभापतींनी लक्ष देण्याची मागणी  !

सोलापूर बाजार समिती बनताहे समस्यांची कमिटी ; सभापती उपसभापतींनी लक्ष देण्याची मागणी  !

नव्या संचालक मंडळासमोर आर्थिक घोटाळा, कांदा चोरीसह अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२७ मे

राज्यात विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अस्वच्छतेचा आणि वाढत्या चोरीचा प्रश्न नव्या संचालक मंडळासमोर उभा ठाकला आहे. ज्या प्रमाणे सोलापूर बाजार समिती आर्थिक उलाढालीत तसेच अस्वच्छता व चोरीच्या वाढत्या प्रकरणामध्ये देखील अव्वल क्रमांकावर येत आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलण्याचे मोठे काम नव्या सभापती आणि संचालक मंडळासमोर असणार आहे.

          दरम्यान, सोलापूरच्या बाजार समितीमध्ये फळ व भाजीपाला विभागात दररोज मोठ्या प्रमाणात भाज्यांची व फळांची आवक होते. ज्या भाज्यांना व फळांना चांगला दर लिलावामध्ये प्राप्त होतो. त्याची विक्री होते. मात्र ज्या फळांना  व भाज्यांना उत्तम दर प्राप्त होत नाहीत. त्या फळ आणि भाजीपाल्यांना मात्र बाजार समितीमध्येच टाकून दिले जाते. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात जागोजागी सडलेल्या  भाज्यांचा व फळांचा ढीग पडून सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे. ऐन पावसाळ्यात हे विदारक चित्र बाजार समितीच्या आवारात पहावयास मिळत आहे. या अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. अशातच आता मोकाट जनावरांचा सुळसुळाट देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने कचऱ्याचे ढीग उचलण्यात अडचणी येत आहेत. बाजार समितीच्या स्वच्छतेचा मक्ता मक्तेदाराकडे देण्यात आला होता. मात्र कालांतराने सदरचा मक्ता रद्द करण्यात आला. त्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतेचे कामकाज सुरू झाले. मात्र यंत्रणा अपुरी ठरत असल्यामुळे सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी वाढल्याचे बाजार समिती मधील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत.

       सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामधील अनेक ग्रामीण भागातून फळे व भाजीपाल्याची आवक होत आहे. सलग तीन ते चार दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसाचा परिणाम भाजी विक्रीवर झाला आहे. विक्रीसाठी आणलेल्या फळभाज्या व पालेभाज्यांना दर मिळत नसल्याने भाज्या उत्पादक

शेतकरी दराभावी सदरच्या भाज्या आहे त्याच ठिकाणी टाकून निघून जात आहेत. भाज्यांचा आणि फळांचा ढीग तसाच टाकून देण्यात आल्याने येथे मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे. बाजार समिती प्रशासनाने वेळोवेळी स्वच्छता ठेवावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी, ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

वाढत्या चोरीसह अस्वच्छता आणि दुर्गंधी प्रश्न ऐरणीवर  

सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा चोरी, अस्वच्छतेचा व दुर्गंधीचा मोठा  प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात काढून घेण्याचा प्रकार वारंवार घडतो. कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचा शेतमाल उचलतात असे कित्येक वेळा सांगण्यात येते. परंतु यावर सकारात्मक तोडगा काढला जात नाही. हमाल माथाडी कामगारांची लेव्ही माथाडी बोर्डात भरली जात नाही. त्यामुळे त्यांना देखील त्यांचे कष्टाचे पैसे मिळणे अवघड बनते. पावसाळ्यामध्ये आता अस्वच्छता आणि दुर्गंधी यांचा प्रश्न भेडसावणार आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने बाजार समितीमधील अवकाळा समोर आणलेली आहे. नव्या सभापतींसह संचालक मंडळासमोर वाढती चोरी अस्वच्छता आणि दुर्गंधी यांचे मोठे आव्हान असणार आहे. यापूर्वी देखील कांदा चोरीने जंगजंग पाछाडले होते. मात्र प्रशासनाला यावर आळा घालता आला नाही. आता मात्र संचालक मंडळाने कठोर कारवाई करत, विविध प्रश्नाचे समोर उच्चाटन करणे गरजेचे बनले आहे.

शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे हित जोपासण्याची गरज…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे उद्दिष्ट साध्य होणे गरजेचे आहे. ज्या हेतूने शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणतो. त्यांना अपेक्षित आणि आधारभूत हमीभाव मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कामगारांना देखील त्यांच्या कामाचा मोबदला मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र बाजार समितीमध्ये काही व्यापाऱ्यांनी या चैन मध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडवणे, कामगारांचे कष्टाचे पैसे चुकवणे, अशा घटना वारंवार बाजार समितीत घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या पाठबळावर काही मोजक्या लोकांमार्फत असे कामकाज सुरू राहते. अशांवर कठोर कारवाईचा फास आवळणे आवश्यक आहे. सभापती व उपसभापती तसेच संचालक मंडळ यांच्यामार्फत संबंधितांवर कडक कारवाई करत, बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे हित जोपासण्याची गरज निर्माण झालेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *