बाजार समितीच्या निवडणुकीला हिरवा कंदील ? निवडणूक कार्यालय लवकरच घेणार अंतिम निर्णय  ! 

बाजार समितीच्या निवडणुकीला हिरवा कंदील ?

जुन्याच मतदार याद्यांवर घेणार निवडणूक ?  निवडणूक कार्यालय लवकरच घेणार अंतिम निर्णय !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ डिसेंबर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका तसेच बाजार समिती निवडणूकीचे वेध लागलेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सर्व कामकाज देखील सुरू करण्यात आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीला शासनाने स्थगिती दिली होती. आता या स्थगितीला देण्यात आलेली ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीचा पुढील प्रारुप कार्यक्रम तयार करुन लवकरच सहकार निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्राधिकरणाने मंजूरी दिल्यानंतर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत.

 

          दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात भाजपचे आ.विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे हे चार आमदार आहेत. पूर्वी विजयकुमार देशमुख हे सभापती होते. त्यानंतर बाजार समितीमध्ये प्रशासकराज सुरू झाला. प्रशासकांच्या काळात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक आता स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर बाजार समितीची निवडणूक मनावर घेतलेली दिसत आहे. दरवेळेस प्रमाणे काँग्रेसकडून सुरेश हसापुरे हे बाजार समितीचे किंगमेकर ठरणार का? का, दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हे मार्केट यार्डचे किंगमेकर ठरणार याकडे देखील सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

      सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत जवळपास ५ हजार ४७० मतदारांची नोंदणी झालेली आहे. तर यामध्ये सर्वाधिक मतदार १२७६ हे व्यापारी मतदारसंघात आहेत, तर त्या पाठोपाठ हमाल तोलार मतदारसंघात १ हजार ८५ आहेत. त्यानंतर विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघात दक्षिण सोलापूर तालुक्यात १ हजार ३९ मतदार आहेत. तर उत्तर सोलापूर तालुक्यात ६६३ मतदार आहेत. विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागेवर मात्र सुरेश हसापुरे आणि माजी आमदार दिलीप मानेयांचाच दबदबा कायम राहणार असल्याचे सांगण्यात येते. हमाल तोलार, व्यापारी मतदारसंघातही भाजपा कमाल करण्याची शक्यता आहे.

    विकास सोसायटी मतदारसंघात मात्र हसापुरे आणि माने बाजी मारतील त्यामुळे कॉंग्रेसच्या पॅनलमध्ये कोण असणार? भाजपा बरोबर कोण जाणार? का गत वेळेप्रमाणे सुभाष बापू यांना शह देण्यासाठी, एकत्रित येऊन पॅनल करणार ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षांतर्गत यावर साधक बाधक चर्चा सुरू असून, या चर्चेनंतरच बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

जुनीच मतदारयादी अंतिम राहणार ? 

यापूर्वी १ जुलै २०२४ ही अहर्ता दिनांक लक्षात घेवून निवडणूक अधिकाऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५ हजार ४७० मतदारांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी अनेक मतदार अपात्र अथवा मयत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारयादी पुन्हा करण्याची मागणी काहीनी केली होती. मात्र निवडणूक कार्यक्रम जरी जाहिर झाला तरी मतदारयादी तीच अंतिम राहणार असल्याचा निर्वाळा निवडणूक कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र जोवर निवडणुकीचा प्रारूप कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत यावर बोलणे अंतिम असणार नाही असेही सांगण्यात येत आहे. तसेच ३१ डिसेंबर नंतर पुन्हा या निवडणूकीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी वरिष्ठांना याबाबत विचार केल्याची चर्चा आहे. पुढील कार्यक्रम ठरवून लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *