अरे व्वा…. खुद्द सभापतींनीच भाजीपाल्याची लावली बोली भारी ; माने मालकांची कामाची पद्धतच न्यारी

सायंकाळचा लिलाव सुरू : शेतकऱ्यांची होणार सोय
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि २७ जून
सोलापूर बाजार समितीच्या कारभारात नव्या सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असलेले सभापती दिलीप माने आज वेगळ्याच भूमिकेत गेले. त्यांनी शेतकरी असलेल्या आपल्याच कार्यकर्त्याला जास्तीचा दर मिळावा यासाठी मेथीच्या भाजीची स्वतःच लावली बोली.

दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने गुरुवारपासून भाजीपाल्यांचे लिलाव सकाळी आणि सायंकाळी असे दोन वेळा करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळच्या लिलावाचा प्रारंभआज करण्यात आला. यावेळी स्वतः दिलीप माने लिलावात बोली लावताना दिसून आले. त्यांचे कार्यकर्ते नानासाहेब पवार (गावडी दारफळ) या शेतकऱ्याने मेथीची भाजी विक्रीसाठी आणली होती. त्याचा लिलाव करण्यासाठी स्वतः सभापती पुढे सरसावले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हसापुरे, सुभाष पाटोळे, प्रथमेश पाटील, नागना बनसोडे, अविनाश मार्तंडे, वैभव बरबडे, मुश्ताक चौधरी यांच्यासह केदार उंबरजे, केदारलिंग विभुते, माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, प्रभाकर विभुते, सचिव अतुलसिंग रजपूत, संभाजी भडकुंबे, अरुण बिराजदार, व्यापारी असोसिएशनचे सुरेश चिकळी, श्रीशैल अंबारे, रेवणसिद्ध आवजे, रणजीत दवेवाले, रवी भोपळे, शेतकरी नाना पवार (गावडी दारफळ), आप्पा ठोकळे (सावरगाव), तुषार माने, इस्माईल शेख, खरेदीदार बालाजी जाधव, सागर स्वामी, संतोष दुपारगुडे, व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.
आम्ही कायम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी
मागील काही दिवसात काय झाले माहीत नाही. नवीन संचालक मंडळ शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समन्वय घडवून बाजार समितीचा कारभार करू पाहते. समितीचे कर्मचारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवेची बाजार समितीच्च्या आवारातील सर्वांनीच कदर केली पाहिजे. काही वेळा कर्मचाऱ्यांना दरडावण्याचा प्रकार होतो. यापुढे तो खपवून घेणार नाही. बाजार समिती कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहील असे सांगीतले.
यापूर्वीच निर्णय घेणे अपेक्षित होते….
बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सायंकाळी भाजीपाल्याचा लिलाव होत आहे. वास्तविक यापूर्वीच व्हायला हवा होता. सर्वांचाच आग्रह होता. आता शेतकऱ्यांची ताजी भाजी सोलापूरकरांना मिळेल.
दिलीप माने, सभापती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती