सोलापूर बाजार समितीत नवा गडी नवे राज्य ;      सभापतीनंतर सचिव पदासाठी रस्सीखेच !अतुलसिंग राजपूत यांचे नाव आघाडीवर 

सोलापूर बाजार समितीत नवा गडी नवे राज्य ;      सभापतीनंतर सचिव पदासाठी रस्सीखेच !

माने यांचे विश्वासू अतुलसिंग राजपूत यांचे नाव आघाडीवर 

  इच्छुक अधिकाऱ्यांकडून आपल्या नावाची वर्णी लावण्यासाठी गॉडफादरकडे जोरदार लॉबिंग सुरू

प्रतीनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ मे 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत माजी सभापती दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हासापुरे यांच्या पॅनलने भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्यासाठी सोलापूर ते मुंबई असे जोरदार राजकीय खलबते झाली. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने दिलीप माने पुन्हा एकदा बाजार समितीचे सभापती सभापती बनले.

   

दरम्यान, सभापती निवडीनंतर आता सचिव पदासाठी बाजार समितीमधील अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असलेले दिसून येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रेय सूर्यवंशी हे येत्या महिना अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी इच्छुक अधिकाऱ्यांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. ३५०० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असणाऱ्या सोलापूर बाजार समितीच्या सचिव पदालाही मोठा “अर्थ” आहे. सचिवाच्या सहीने बाजार समितीचा कारभार चालतो. यामुळे नवीन संचालक मंडळ त्यांच्या मर्जीतलाच अधिकारी खुर्चीत बसणार हे नक्की.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी हे येत्या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. ते मुदतवाढ घेण्यास इच्छुक नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. यामुळे नवीन सचिवाची निवड होण्याची शक्यता आहे. सूर्यवंशी यांच्या अगोदर बरीच वर्ष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवपद प्रभारी अधिकाऱ्याकडेच राहिले आहे. मात्र तत्कालीन प्रशासक मोहन निंबाळकर यांनी सूर्यवंशी यांची पूर्णवेळ सचिव म्हणून निवड केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराचे संपूर्ण नियंत्रण सभापती व संचालक मंडळाच्या हातात असले तरी ते पणन कायद्याच्या चौकटीत बसवण्याची जबाबदारी सचिवांवर असते. यामुळे बाजार समितीच्या प्रशासनात सचिव पदालाही मोठे “महत्त्व” प्राप्त झाले आहे. या पदासाठी आपल्या मर्जीतलाच अधिकारी असावा अशीच व्यवस्था राजकारणी मंडळी करतात. त्याचबरोबर बाजार समिती आवारातील व्यापारी व अडती हमाल यांच्या दृष्टीने ही सचिव पदावरील अधिकारी कोण आहे, हे महत्त्वाचे आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारात नवीन सचिव कोण? असणार याबाबत चर्चा सुरू आहे.

सचिवपदासाठी बाजार समितीच्या वर्तुळात या नावांची चर्चा…

सहसचिव चंद्रशेखर बिराजदार, माजी प्रभारी सचिव विनोद पाटील, महेश बोराळकर, सिद्धेश्वर राजमाने, अतुलसिंह राजपूत या अधिकाऱ्यांची नावे सचिव पदासाठी बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

सचिव निवडीचे सर्वाधिकार माने यांनाचा…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सचिवाच्या निवडीबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीतील निर्णयानुसार सचिव निवडीचे सर्वाधिकार सभापती माजी आमदार दिलीप माने यांना देण्यात आले आहे. त्यांची “मर्जी” कोणावर राहणार याकडेच बाजार समितीच्या परिसराचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *