बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात कल्याणशेट्टींच्या पॅनलने मारली बाजी ! विजयश्रीचे किंगमेकर ठरले माने अन हसापुरे

बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात कल्याणशेट्टींच्या पॅनलने मारली बाजी !

सलग दुसऱ्या विजयश्रीचे माने अन हासापुरे ठरले किंग मेकर

तर सुभाष देशमुख पॅनलचे तीन उमेदवार झाले विजयी

सर्वांना एकत्रित घेऊन सोलापूर बाजार समिती आग्रगन्य ठेवू – आ.सचिन कल्याणशेट्टी 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि.२८ एप्रिल

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्याच पॅनलचे वर्चस्व राहिले. बाजार समितीच्या १८ संचालकापैकी तब्बल १५ जागा जिंकण्यात कल्याणशेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आले. तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभे केलेल्या परिवर्तन पॅनलकडे ग्रामपंचायत मतदार संघाच्या तीन जागा गेल्या. ग्रामपंचायत मध्ये मात्र आमदार बापू यांनी विरोधकांना चांगलेच ताणवल्याचे पाहायला मिळाले. मात्र या विजयाचे खरे  किंगमेकर माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हेच ठरल्याचे दिसून आले.

    

   आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनल मध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंडा ही प्रमुख नेतेमंडळी होती. तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, चनगोंडा हवीनाळे, धनेश आचलारे त्यांच्यासह इतरांचा समावेश होता. बापूंनी या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे काका साठे, महादेव चाकोते, जाफरताज पाटील, बाळासाहेब शेळके या नेत्यांची मदत घेतली होती. त्याचा ग्रामपंचायत मध्ये निश्चितच फायदा झाला. मात्र बाजार समितीवर आपली सत्ता आणू शकली नाही.

सुरेश हासापुरे यांना विजयी झाल्यानंतर शुभेच्छा देताना मनीष देशमुख…

   रविवारी या निवडणुकीसाठी तब्बल ९६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सुरुवातीला सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदार संघाचे मतमोजणी घेतली. यामोजणीमध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारत चार पैकी तीन जागा जिंकल्या. सर्वसाधारण मधून मनीष देशमुख, रामप्पा चीवडशेट्टी तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. आर्थिक दुर्बल मधून मात्र यतीन शहा यांना पराभवाचा धक्का बसला. त्या ठिकाणी कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके हे विजयी झाले. ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर रवी रोकडे आणि संगमेश बंगले पाटील यांना पराभवाचा धक्का बसला.मनीष देशमुख यांनी पहिलीच निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला त्यांच्या जल्लोषासाठी मतमोजणी केंद्राबाहेर युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

    दरम्यान, सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्ग या सर्व ११ चे ११ उमेदवार तब्बल ८०० मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. सोसायटी मतदारसंघातून कपबशीला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे. या निकालाने दिलीप माने व सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवर असलेली पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार आणि पडलेली मते 

 

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ 

 

विजयी उमेदवार          मिळालेली मते

मनीष देशमुख            ६३५

रामपा चिवडशेट्टी        ६१४

ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ 

विजयी उमेदवार      मिळालेली मते 

अतुल गायकवाड     ५८९

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघ 

विजयी उमेदवार      मिळालेली मते 

सुनील कळके           ५७०

सोसायटी मतदारसंघ

विजयी उमेदवार      मिळालेली मते 

श्रीशैल नरोळे            १२४४

उदय पाटील              १२७६

प्रथमेश पाटील          १२६८

नागण्णा बनसोडे      १२७६

दिलीप माने              १३६२

राजशेखर शिवदारे    १३६६

सुरेश हसापुरे           १३५२ 

 

सोसायटी महिला राखीव मतदारसंघ

विजयी उमेदवार        मिळालेली मते 

इंदूमती अलगोंडा       १३२७

अनिता विभुते            १२८८

सोसायटी इतर मागासवर्ग मतदार संघ 

विजयी उमेदवार         मिळालेली मते

अविनाश मार्तंडे          १३४५

सोसायटी आर्थिक दुर्बल मतदार संघ

विजयी उमेदवार      मिळालेली मते 

सुभाष पाटोळे            १२४३

व्यापारी मतदारसंघ 

विजयी उमेदवार            मिळालेली मते 

मुस्ताक चौधरी                   ६२३

वैभव बरबडे                     ६६१

हमाल तोलार मतदारसंघ 

विजयी उमेदवार               मिळालेली मते 

गफार चांदा                     ३७३

सुरेश हसापुरे आणि मनिष देशमुख यांची गळाभेट 

निकालानंतर बाहेर पडताना मनीष देशमुख आणि संचालक सुरेश हसापुरे यांची भेट झाली. या दोघांनीही राजकीय संस्कृती जपत एकमेकांची गळाभेट घेतली.निकालानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दिलीप माने, सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे आणि त्यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजय प्रमाणपत्र घेतले.विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतदान मोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या अपयशाचे आम्ही सर्व नेते चिंतन करू अशी प्रतिक्रिया देताना हा विजय सर्वसामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा असल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांनी सांगितले.

आम्ही सर्वजण एकत्रित मिळून शेतकरी हितासाठी कार्य करू 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक आम्ही पुन्हा एकदा जिंकलेली आहे. केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे ही निवडणूक जिंकता आली. पुढील बाजार समितीची सर्व कार्य शेतकरी हितासाठीच राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पॅनल मधील सर्व वरिष्ठ नेते मंडळी यांचा विचाराने पुढील सभापती उपसभापती निवड करण्यात येईल. सर्वांच्या एकत्रित कार्यामुळे हा विजय झालेला आहे. 

– दिलीप माने, माजी आमदार तथा विजयी उमेदवार 

बाजार समितीचा हा विजय म्हणजे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा आमचीच सत्ता आली आहे. हा विजय म्हणजे शेतकऱ्यांनी आमच्या व आमच्या पॅनलवर दाखवलेला विश्वास आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची प्रगती आणखीन उत्तरोत्तर वाढवू. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू.

– सचिन कल्याण शेट्टी, आमदार तथा पॅनल प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *