बाजार समितीसाठी नेतेमंडळींचे गुवाहाटी पॅटर्न  ? निवडणुकीसाठी नेतेमंडळी पोहोचले मतदारांच्या उंबरठ्यावर

मार्केट कमिटीच्या सत्ताधाऱ्यांना राज्यातील सत्ताधारी देणार का शह !

निवडणुकीसाठी नेतेमंडळी पोहोचले मतदारांच्या उंबरठ्यावर

नेतेमंडळी बैठकीत दंग तर उमेदवार कार्यकर्त्यासंगे प्रचारात व्यस्त…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२१ एप्रिल

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. या लक्षवेधी निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. गावोगाव अन् घरभेटीने वातावरण अक्षरक्ष: ढवळून निघत आहे. दोन पॅनलच्या प्रमुखांसह उमेदवारांनी पायला भिंगरी बांधून दक्षिण उत्तर तालुक्यात गावोगाव भेट देत आहेत. मतदारांना आपण केलेल्या विकास कामांची तसेच भविष्यातील कामांची माहिती देत आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेसह इतर प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींचादेखील समावेश आहे.विशेषत्वे, मतदारांमध्ये ‘सांगा.. सांगा.. कधी अन् कुठे येऊ द्या’ असा मोबाईलवर संवाद होत आहे, तो संवाद खूप काही सांगून जात असल्याची चर्चा निवडणुकीच्या धामधुमीत उठली आहे.

        दरम्यान, बाजार समितीची निवडणूक शेतकरी, शेती उत्पादन व उत्पन्न यावर आधारित विविध अडचणीचा आधार घेऊन निवडणूक लढवली जात आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये आमदार विरुद्ध आमदार असा थेट सामना होत आहे. शेती व शेतकरी हा विषय ध्यानात घेत शेतकरी विकास व शेतकरी परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. बाजार समितीच्या यानिवडणूकीत एकूण ७० उमेदवार आपले नशीब आजमावत असले, तरी देखील खरी लढत भाजप आमदार विरुद्ध भाजप आमदार यांच्या मध्येच दिसून येत आहे. सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघ हा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूरमध्ये समाविष्ट असून बाजार समितीचा खरा मतदार हा ग्रामपंचायत सोसायटी मधील पदाधिकारी, सदस्य हे आहेत. तर व्यापारी मतदारसंघातील मतदार हे व्यापारी, हमाल व तोलार हे आहेत.

          सत्ताधारी पॅनलचे सोसायटी आणि ग्रामपंचायत मध्ये मोठी ताकद आहे. दक्षिण उत्तर तालुक्यातील विविध सोसायटी आणि सहकारी संस्थांवर सत्ताधारी नेतेमंडळीचे वर्चस्व अभाधित आहे. अशा स्थितीत राज्यातील सत्ताधारी तथा बाजार समितीमधील विरोधक बापू आणि मालक हसापुरे व माने यांच्या विरोधात बाजार समितीसाठी कोणती व्यूहरचना आखतात, हे पहावे लागणार आहे. दक्षिण व उतर तालुक्यातील विविध सोसायटी ग्रामपंचायत तसेच सहकारी संस्थांमध्ये विविध पदाधिकारी आणि सदस्य यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्यासाठी पॅनलमधील उमेदवार गावोगाव जात आहेत. उत्तर व दक्षिण तालुक्यातील नेते शेतकरी सोसायटी व ग्रामपंचायतनेतेमंडळी बैठका घेण्यामध्ये दंग आहेत तर दुसरीकडे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असते चित्र दिसत आहे.

बाजार समितीचे गुवाहाटी पॅटर्न 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक आता ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. गत निवडणुकीत भाजप अंतर्गत देशमुख यांचे दोन गट सक्रिय होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत दोन्ही देशमुख आमदार एकाच पॅनलखाली आल्याने आपल्याच पक्षातील आमदाराला आव्हान देत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे “दुश्मन का दुश्मन अपना दोस्त” ही भूमिका घेत सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलप्रमुख नेतेमंडळींच्या तसेच मतदारांच्या उंबरठ्यावर जाताना दिसत आहेत. गावभेट दौरा तसेच गाठीभेटी घेऊन अनेकांना आपल्या पॅनलमध्ये ओढण्याचे गुवाहाटी पॅटर्न सुरू केलेले दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी भाजप काँग्रेस युती करत नवा फॉर्मुला तयार केला आहे. तर गत निवडणुकीत केवळ भाजपच्या एका आमदाराला आपल्या जाळ्यात ओढत सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीवर आपले वर्चस्व आबाधीत राखले होते. तोच फार्मूला सत्ताधाऱ्यांनी पुढे वापरला आहे. मात्र पक्षांतर्गत कलह वाढत गेला आणि गत निवडणुकीत ज्या विरोधकांना आसमान दाखवले, त्यांच्याच पंक्तीत येऊन आज माजी सभापती बसले आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी आमदार मालक बापूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले दिसत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार माने हसापुरे यांनी आपले राजकीय सारिपाटातील चातुर्य पणाला लावत भाजप पक्षाचे आमदार कल्याणशेट्टी यांना सोबत घेऊन सरकारची मर्जी खप्पा होऊ नये याची दक्षता घेतली आहे. मात्र आता विरोधकांना अनेकांचा पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठका, गावभेट दौरे, कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक राज्यस्तरावर पोहोचल्याने, याकडे आता सर्वसामान्य जनता, मतदार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे देखील लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *