बाजार समितीचा आखाडा देशमुख विरुद्ध देशमुख गाजणार?
भाजपसह काँग्रेसमधील रुसव्यांवर सुवर्णमध्य श्रेष्ठी साधणार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ मार्च
राज्यातील विक्रमी उलाढालीसाठी दुसऱ्या क्रमांकाची असणारी सोलापूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कित्येक दिवसांपासून भिजत पडलेले घोंगडे अखेर वाळण्याच्या मार्गावर आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक पैलवानांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलमध्येच घमासान निवडणूक झाली होती. जून २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आ.विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यानंतर आता बाजार समितीच्या आखाड्यात सात वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यावेळी दोन्ही देशमुख मंत्री होते. आता एकही देशमुख मंत्री नाहीत. त्यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिद्धाराम म्हेत्रे व प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचे दोन आमदार बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. आता याठिकाणी सचिन कल्याणशेट्टी व देवेंद्र कोठे हे दोघे भाजपचे आमदारांची एन्ट्री होणार आहे.
गत निवडणुकीत शेतकऱ्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारातून बाजार समितीची निवडणूक झाली. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेकांचा बाजार समितीत प्रवेश झाला. यंदाची निवडणूक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदारांमधून होणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सहकारात माजी आमदार दिलीप माने आणि सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे मतदारांची निर्णायक ताकद दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांचा कौल कोणाकडे? यावर देखील बाजार समितीचे राजकीय भवित्यव अवलंबून आहे.
दोन दिग्गज देशमुखांना मंत्रीमंडळात संधी मिळालेली नसताना विधिमंडळाच्या समिती अध्यक्षपदातून आमदार कल्याणशेट्टी यांना संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फॅन क्लबमध्ये सध्या कोण? याचा अंदाज येऊ लागला आहे. अक्कलकोट विधानसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद गट असल्याने या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्त्वाची व निर्णायक ठरणार आहे. बाजार समितीची निवडणूक जिंकायची कशी? याचा चांगला दांडगा अनुभव आमदार कल्याणशेट्टी यांच्या गाठीशी आहे. यातूनच त्यांनी चमत्कारिकरित्या दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिगजांचा पराभव करता आला आहे. सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, यासाठी भाजप आमदारांचा न झालेला मेळ, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तरी लागेल का? याची मोठी उत्सुकता बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत तुटलेली मने जोडण्याचे खा.प्रणितींसमोर आव्हान
बाजार समितीत निर्णायक असलेले माने-हसापुरे काँग्रेसमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीत बी. फॉर्म सोलापुरात होता परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही दिलीप माने यांना तो मिळाला नाही, म्हणून माने समर्थक अस्वस्थ आहेत. तशीच स्थिती हसापुरे समर्थकांची आहे. विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार माने तर विधानसभा निवडणुकीनंतरपासून हसापुरे काँग्रेससोबत सुरक्षित अंतर ठेवून असल्याचे दिसते. त्यामुळे विधानसभा निवडणुकी दरम्यान तुटलेली मने पुन्हा जोडण्याचे मोठे आव्हान खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर असणार आहे. त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील काँग्रेसच्या अपयशानंतर बाजार समितीच्याही अपयशाचा ठपका त्यांच्यावर बसू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सोलापूर बाजार समिती काबीज करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी कोणते भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.